November 20, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी- डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन 29 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, रिलायन्स पिक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक एस आर कोडीयातर, क्लस्टर हेड वाय व्ही अवघडे, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दिलीप लहाने आदी उपस्थित होते. अतिवृष्टीबाधीत भागातील खरीप पिकांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ मदतीबाबत संबंधीत यंत्रणांची आढावा बैठक घेतली.पालकमंत्री पुढे म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात एनडीआरएफ मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त पीकाचे नुकसान असल्यास जीरायत शेतीसाठी प्रती हेक्टरी 6800 व बागायती शेतीसाठी 13500 रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. त्याचप्रमाणे फळपिकांकरीता प्रती हेक्टरी 18000 रूपयांची आर्थिक मदत निकषानुसार देण्यात येते.

जिल्ह्यात कृषी विभागाच्या सर्वेनुसार अतिवृष्टीमुळे 38 हजार 68 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना 25 कोटी 95 लक्ष रूपयांची आर्थिक मदत मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. या मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप पिकांसाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत पीक विमा कंपनी तसेच कृषि विभागाचे कार्यालयाला कळविले आहे, अशा शेतकऱ्यांचा तात्काळ सर्वे करून पंचनामे पूर्ण करावे. त्यांना संबंधीत पिक विमा कंपनीने विम्यापोटी देण्यात येणारी आर्थिक परतावा 100 टक्के द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
पिक कर्ज वाटपाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, प्रत्येक बँकेने त्यांचेकडील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत लाभ झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करावे. सर्व बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाएवढे पात्र शेतकरी उपलब्ध नसल्याचे बँकांनी आढावा सभेमध्ये सांगितले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या मात्र कर्जवाटप होऊ न शकलेल्या पात्र सभासदांची बँक / शाखा निहाय जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयास पाठविली आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधीत व्यापारी / ग्रामीण बँकांनी त्यांचे कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करावे व नियमित अहवाल सादर करावा. याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

राज्यातील ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी तात्काळ जिल्हानिहाय नियोजन होणे गरजेचे, वेळ पडल्यास आंदोलन करू – अशोक सोनोने,

nirbhid swarajya

ज्ञानगंगा अभयारण्यात C-1 वाघासह वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार

nirbhid swarajya

विकास कामावर खर्च केले मिळालेले कमिशन, जलंब सरपंच पती च्या वक्तव्याने खळबळ…

nirbhid swarajya
error: Content is protected !!