मोठा अपघात होण्याची शक्यता
खामगांव : विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्राला वेलींचा विळखा पडल्याने धोका निर्माण झाला. ‘महावितरण’ने शहरातील रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बहुतांश विद्युत रोहित्राच्या खाली तर खांबाला झाडेझुडपे आणि वेलींनी वेढल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे विजेच्या लोखंडी खांबांमध्ये वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. नागरिकांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतरही रोहित्राला पत्र्याच्या साह्याने संरक्षक कवच बसविण्यात आलेले नाही.

त्यामुळे उघड्यावर असलेल्या रोहित्रांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही.उच्चदाब वीजवाहिन्यांचे संचही रस्त्याच्या कडेलाच उभे केल्याचे दिसून येते. शिवाय इतर झाडेझुडपेही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ओल्या वेलींमधून लोखंडी खांबांमध्ये किंवा जाळ्यामध्ये वीज उतरून धोका निर्माण होण्याची शक्यता असताना ही झाडे किंवा वेली वेळेवर काढल्या जात नाहीत. त्यामुळे महावितरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज उद्भवली आहे.