January 4, 2025
बुलडाणा शिक्षण

विशाल नरवाडे यांना युपीएससी परीक्षेत ९१ वी रँकींग

बुलडाणा : ‘मंजीले उन्हींको मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंखो से कुछ नहीं होता, हौसलो से उडान होती है! या प्रेरणादायक ओळी आपण भाषणात किंवा कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाच्या ओठी ऐकायला असतील. या ओळी म्हणायला सोप्या आहेत पण यावर जगायचे म्हटले की, विशाल नरवाडे यांच्याएव्हढी मेहनत, परीश्रम आणि धैर्याची गरज पडते. बुलडाणा जिल्ह्यातील धाड जवळच्या सावळी नावाच्या छोट्याश्या गावखेड्यातून विशाल नरवाडे यांनी युपीएससी परीक्षेत ऑल इंडीया ९१ व्या रँकींगसह गगनभरारी घेतली आहे. सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ. तेजराव नरवाडे आणि सावळीच्या सरपंचा सौ. सविताताई तेजराव नरवाडे यांच्या सुपुत्राने गावाच्या गौरवान्वित इतिहासाचा ‘विशाल’ पाया रचला आहे. सध्या हैद्राबाद येथे आयपीएस ट्रेनिंगच्या अंतिम टप्प्यात असणारे विशाल नरवाडे पुन्हा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून आयएएस बनले आहेत.
जिद्दीशिवाय कुठलेही ध्येय गाठता येणे अशक्य आहे. शिकण्याच्या जिद्दीचा वारसा विशाल नरवाडे यांना वडीलांकडून मिळाला तर विपरीत परिस्थीतीतही ध्येयापासून न ढळण्याचे धारिष्ट्य त्यांना आईकडून मिळाले. घरी मात्र दोन एकर कोरडवाहू जमीन आणि परिस्थीती जेमतेम. तेजराव नरवाडेंनी दूसर्‍याचे शर्ट घालून दहावीची परीक्षा दिलेली आहे. वर्ग ३ ची नोकरी त्यांना मिळाली. सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त होतांना ते सहाय्यक पशुधन अधिकारी झाले. पण उच्च आणि चांगले शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा पूर्ण होवू शकली नाही. मात्र आपल्या मुलांनी खूप शिक्षण घ्यावे, मोठे बनावे, हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण होणे, प्रत्येकाच्याच प्रारब्धात नसते.
डॉ. तेजराव नरवाडे यांचे भाग्य मात्र याबाबत फळफळले. त्यांची मोठी मुलगी प्रतिभा एमबीबीएस डीएनबी स्त्री रोग तज्ञ झाली तर मुलगा विशाल आज आयएएस बनले आहेत. मातीच्या गोळ्याला आकार देवून होत नाही तर त्याला घडवावे सुद्धा लागते. विशाल नरवाडे यांना वडीलांनी आकार दिला खरा पण घडविण्याचे काम आईने केले. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण करून विशाल यांना पाचवीसाठी भडगावच्या शरद पवार हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. सहावी आणि सातवी त्यांनी नवोदय विद्यालय शेगांव येथे काढली. त्यानंतर बुलडाणा येथील भारत विद्यालयात त्यांनी आठवीमध्ये प्रवेश घेतला याच विद्यालयातून दहावीची परीक्षा दिल्यानंतर ते बोर्डात २५ वे मेरीट आले होते. राजर्षी शाहू क. महाविद्यालय लातूर येथे त्यांनी अकरावी आणि बारावी पूर्ण केली. त्यानंतर जबलपूर आयआयटीमध्ये बी.टेक. झाले. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्यांना बँगलोरच्या एका कंपनीने ८.५० लाख रुपयांचे पॅकेज देत ४०० विद्यार्थ्यांमधून निवडले. पण आपल्याला सिव्हील सर्व्हीसमध्ये जायचे, हा दृढ निर्धार केलेला असल्यामुळे कंपनी सोडून विशाल नरवाडे यांनी युपीएससीचा मार्ग धरला. त्यासाठी त्यांनी देशाची राजधानी दिल्ली गाठली. मेसचे बेचव जेवण अभ्यासाच्या संघर्षात अडथळा बनत होते. मग नरवाडे कुटूंबाचा निर्णय झाला आणि आई सविताताई यांनी मुलासोबत दिल्लीत राहण्याचे ठरविले. जेव्हा एखादी ग्रामिण भागातील स्त्री दिल्लीसारख्या महानगरात राहायचे म्हटल्यावर असंख्य अडचणी निर्माण होतात. भाषेच्या अडचणीपासून शहरी संस्कृतीपर्यंत सर्व अडचणींना सविताताईंनी तोंड दिले. पण मुलाच्या अभ्यासात कुठलाही खंड पडू दिला नाही. डॉ. तेजराव नरवाडे यांनी दिलेल्या आपल्या भावनिक प्रतिक्रियेत म्हटले की, ‘मी केवळ पैसे पोहोचविले परंतु खरी काळजी घेतली ती त्याच्या आईनेच. तिच्या कष्टाला निर्भीड स्वराज्य चा सलाम !!विशाल नरवाडे यांनी मागे वळून पाहीले नाही. दिल्लीत युपीएससीची स्वतःला पूर्ण झोकून देत तयारी केली. २०१६ मध्ये ते आयपीएस झालेत. त्यांचे हैद्राबादला प्रशिक्षण सुरु झाले. यादरम्यान त्यांनी पुन्हा परीक्षा दिली पण त्यांना पुन्हा आयपीएसची रँकिंग मिळाली. आता तिसर्‍या प्रयत्नात ते आयएएस झाले आहेत. ते दोन्ही वेळेस मुलाखतीपर्यंत पोहोचले. आता मात्र त्यांना संपूर्ण देशातून ९१ वी रँकिंग मिळाली आहे. त्यांचा आयएएस अर्थात जिल्हाधिकारी बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नरवाडे परिवाराच्या परिश्रमाला आणि ‘आयएएस’ विशाल नरवाडे यांच्या जिद्दीला निर्भीड स्वराज्य चा सलाम !

Related posts

मराठा आरक्षणासाठी उद्या डफडे बजाओ आंदोलन

nirbhid swarajya

संत रविदास महाराज जयंती व माघ पोर्णिमेनिमीत्त रविदास महाराजांना अभिवादन

nirbhid swarajya

कोरोनाच्या धर्तीवर जनजागृती करत उभारली गुडी

nirbhid swarajya
error: Content is protected !!