January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढविली


· आरोग्यसेतू ॲप वापरण्याचे आवाहन
· रात्री 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी लागू
· सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक, धुम्रपान, थुंकण्यास बंदी


बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यभर 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य शासनाने राज्यभर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत टाळेबंदीला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात टाळेबंदी 31 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत. या कालावधीत सर्व दुकाने, सेवा, आस्थापना सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकाने / बाजारपेठ येथे गर्दी किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्यात बाबतचे आदेश काढण्यात येणार आहे. दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची काळजी दुकान मालकाने घ्यावी. दुकानात ग्राहकामध्ये 6 फुटाचे अंतर असावे.
जिल्ह्यात रात्री 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. या काळात कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, शारिरीक अंतर राखणे (किमान 6 फूट) बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने थुंकणे गुन्हा आहे. जिल्ह्यात तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास , थुंकण्यास व ई सिगारेटसह सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे, आदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 21 जुलै च्या आदेशानुसार 21 ऑगस्ट पर्यंत यापूर्वीच प्रत्येक शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी औषधालये, दवाखाने, दुध वितरण व संकलन, आवश्यक ती शासकीय वगळून कडक संचारबंदी लागू केलेली आहे. सदर कालावधीत कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कारणास्तव रूग्ण व त्यांचेसोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास त्यांचेविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
आरोग्य सेतू वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्या प्रादुर्भावाबाबत त्वरित सूचना मिळते. त्याचा फायदा व्यक्तीश: व समाजाला सुद्धा होतो. त्यामुळे ॲण्ड्राईड फोनचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यात या सेवांना परवानगी : सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह जिल्ह्यातंर्गत बस वाहतूकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे. संपूर्ण मालवाहतूकीस राज्या बाहेर जाण्यास व येण्यास परवानगी असणार आहे. सर्व दुकाने / बाजारपेठा (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 9 ते सायं 7 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मेडीकल, दवाखाने व तत्सम सेवा, अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू राहण्यास परवानगी असेल.
विवाह समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या मर्यादीत उपस्थितीने खुले लॉन, विना वातानुकूलीक मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी राहील. निर्बंधासह खुल्या मैदानात व्यायाम करण्यास मुभा असेल. खाजगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, हॉटेल्स/ रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थांची केवळ पार्सल घरपोच सुविधा सुरू करण्यास परवानगी आहे. जिल्ह्यातील सर्व मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट 2020 पासून सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत कार्यान्वीत करण्यास मुभा असेल. त्याचप्रमाणे चालक व एका व्यक्तीसह हेल्मेट व मास्कसह दुचाकी चालविण्यास परवानगी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि चालकासह तीन व्यक्तींसाठी फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील. जिल्ह्यातील सर्व मैदाने, जिम्नॅस्टीक्स, टेनिस, बॅडमिंटन व मल्लखांब खेळास 5 ऑगस्ट 2020 पासून सामाजिक अंतराचे नियम पाळून परवानगी राहणार आहे. केश कर्तनालये, पार्लर सुरू राहणार.
जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे: जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीस विना परवानगी बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील, सर्व सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, असेंब्ली हॉल, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदींवर बंदी असेल. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने, पानठेले बंद राहतील. तसेच कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील. विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, अनेक व्याधी असणारे व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. मोठ्य प्रमाणावर लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असेल.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम : कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल ठेवावा. वारंवार निर्जंतुकीकरण करावे. प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरावा. थुंकण्यास बंदी असेल.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

Related posts

देशमुख परिवारात आगळीवेगळी आदर्श शिवजयंती साजरी

nirbhid swarajya

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!