April 19, 2025
जिल्हा

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना पालकमंत्र्यांच पत्र

बुलडाणा :  कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अद्यापही औषधींचा किंवा लसीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे आपल्याला आता या कोरोना बरोबरच लढायला व जगायला शिकावं लागणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींवर जनतेचा विश्वास असतो व या कोरोनाविरुद्ध लढ्याचं जिल्ह्यातील समस्त लोकप्रतिनिधींनी नेतृत्व करावं असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांना पत्र दिले आहे. 

लोकप्रतिनिधींना दिलेले पत्र :

   कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावातून आपला देश, राज्यही सुटले नाही. विषाणूने जिल्ह्यातही आपले अस्तित्व दाखवित २४ नागरिकांना बाधीत केले. जिल्ह्यातील प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून पॉझीटीव्ह रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले. परिणामी जिल्ह्यात एक मृत वगळता २३ कोरोना बाधीत रूग्ण ठणठणीत बरे होवून गेले. यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनाही महत्वाच्या ठरल्या.  शासनाच्या सुचनांनुसार जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्र, संचारबंदीची अंमलबजावणी, गर्दी कमी करण्यासाठी केलेले उपाय आदी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सध्या जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे बऱ्याच सेवांना परवानगी  देण्यात आली आहे. कृषि, बांधकाम, जिवनावश्यक वस्तू व सेवा यासोबतच आणखी काही दुकानांना जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते सायं २ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. याचा अर्थ असा मूळीच नाही, की जिल्ह्यात आता सर्व काही आलबेल झाले. आपला जिल्हा कोरोनापासून सुरक्षित ठेवायचा असल्यास अजूनही आपल्याला संचारबंदीचे काटेकोर पालन करावयाचे आहे. येथून पुढे आपल्याला कोरोना बरोबर जगायला शिकावं लागणार आहे, सोबतच कोरोनाबरोबर लढायला देखील शिकावं लागणार आहे. यासाठी जिल्ह्यातील संसद व विधीमंडळाचे लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आपली मोलाची भूमिका ठरणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात कोरोनापासून बचावासाठी योजलेल्या उपाययोजना, शासनाच्या सुचना व प्रतिबंधात्मक उपायांची जाणीव जागृती नागरिकांमध्ये करावयाची आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या या लढाईत आपण सक्रिय सहभाग नोंदवित या ऐतिहासिक लढयाचे नेतृत्व आपणाला करायचे आहे, अशी विनंती मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपणाला करीत आहे. आपल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्हयामध्ये कोरोनाचा शिरकाव आता होवू द्यायचा नाही. त्यासाठी आपण नागरिकांना आवश्यकता असेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन करावे.  तसेच नागरिकांनी कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा याप्रकारचा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर स्वच्छ रूमाल किंवा मास्कचा वापर करणे, घरातील वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याविषयी जनजागृती करावी. २० नागरिकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्यास परवानगी आहे. त्यामुळे विवाहात २० नागरिकांचीच उपस्थित ठेवावी, कुठेही संचारबंदीचे व शासनाच्या नियमांचे उल्लंघन होता कामा नये, यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना सजग  करावे.कोरोना विषाणू विरुध्दचे युध्द जिंकण्यासाठी शासन व प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची अत्यंत महत्वाची भुमिका व जबाबदारी आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून अधिक सकारात्मक भुमिका निभावणे आवश्यक आहे. जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने मी आपणास आवाहन करतो की, आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याबाबत जनजागृती व प्रबोधन करावे. आपण दिलेला शब्द हा जनता प्रमाण मानते. त्यामुळे आपल्या शब्दाला खूप मोठी किंमत आहे. आपण आपल्या नागरिकांची काळजी घेण्याची हीच वेळ आहे. कोरोनाला हरविण्याचा निश्चय मनात घेवून या लढाईत उतरावे.  तरी या जागतिक महामारीला रोखण्यासाठी तुमचा सक्रीय सहभाग देवून सहकार्य करावे, ही पुन्हा एकदा विनंती.

Related posts

शेगावात नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नालीतील घाण पाणी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर..

nirbhid swarajya

पत्रकार जितेंद्र कायस्थ यांची अज्ञात व्यक्ती कडून कार जाळण्याचा प्रयत्न…

nirbhid swarajya

ज्‍येष्ठ गाैरींच्‍या देखाव्‍यातून डॉक्‍टरांबद्दल व्‍यक्‍त केली कृतज्ञता

nirbhid swarajya
error: Content is protected !!