January 1, 2025
ब्लॉग

‘वास्तवा’ वर थोडंसं..

खरंतर ‘वास्तवावर’ च्या ऐवजी ‘विस्तवावर’ वाचलं तरी काहीच बिघडणार नाही. मांडतोय ती परिस्थिती तुम्हा-आम्हा सगळ्यांसाठी बऱ्याच अंशी सारखी आहे. साधारण पंचवीसीच्या आसपास सगळ्यांच्या डोक्यात एक शब्द घुसतो, तो म्हणजे करीअर. मग त्या शब्दाचा अर्थही कळायच्या आत त्यामागे बेफाम धावाधाव सुरु होते. करीअर करायचे तर मग पुण्या-मुंबई ची वाट धरावी लागते. कारण गावाकडे नोकऱ्या, इतर पर्याय कमीच असतात. एकदा आपण गाव सोडून पुण्या-मुंबईची वाट धरली की आपण आपल्याच घरचे-गावाचे पाहुणे होतो.

गावात कितीही मोठ्ठं घर असलं तरी मुंबईच्या करीअरची सुरुवात म्हाडा, एसआरए, सिडकोच्या ३०० स्क्वे, फूटाच्या भाड्याच्या घरातूनच होते. कधीकधी गणित चुकले तर मग दररोज चाळीतील संडासाबाहेर रांगही नशीबात येते. मग दुसरा पाला पडतो तो लोकलशी. एखादा घडा पाण्याने भरुन वाहत रहावा, तरीही त्यात पाणी पडतच राहाते अशी अवस्था असणाऱ्या लोकल मधून दररोज किमान दीड- दोन तासाचा प्रवास. अगदी गर्दीच्या रेटारेटीत कधी श्वास बंद पडेल एवढी गर्दी. हे आपण करत राहायचं कारण करीअर करायचं असतं. गावी असलेल्या आई-वडीलांच्या चेहऱ्यावर पोरगं मुंबईत नोकरी करतं याचं समाधान टिकवायचं ओझंही असतंच.

मुंबई समजायला आपापल्या बुद्धीमत्तेनुसार दीड-दोन वर्ष जातात. तोपर्यंत सकाळी उठणे, पळापळ करणे, लोकल आणि ३०० स्क्वे फुटात वर्षं निघून जातात. महागाई, भाडेवाढ, वय या गोष्टी झपाट्याने वाढतात. पगार मात्र संथगतीने. जमेल तसं वर्षातून दोनदा गावी जायचं. चार-दोन दिवस पाहुण्यासारखं राहायचं. पुन्हा तेच गावीही काही बदलत नाही. आईवडीलांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या सुरकुत्या आपली जबाबदाऱ्या वाढल्याची जाणीव करुन देतात. पुन्हा गावाहून परतताना आता काहीतरी करायचे जरा वेळ काढायचा, आई वडीलांना द्यायचा अश्या नव्या उमेदीने यायचं आणि आठवडाभरात काय विचार केला होता हे आठवण्याची उसंतही मिळत नाही.
आपल्याला हवी ती प्रगती प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. पुणे-मुंबई या शहराने मोजक्याच लोकांना मोठं केलंय. त्यामागे त्यांचा मोठा त्याग आहे. अनेकांनी जे भौतिक पातळीवर मिळवलंय त्यापेक्षा कितीतरी भावनिक पातळीवर गमावलंय. घर घेतानाही आपल्या स्वप्नाच्या घराचा विचार खूप लांब ठेवून उरलेलं आयुष्य, नोकरीची शाश्वती हे ध्यानात ठेवून लोकेशन आणि स्क्वेअरफूट नाईलाजाने निवडावे लागते. दोनाचे चार, चाराचे सहा असं कुटूंब वाढत जातं. वर्षातून दोनदा ऐवजी गावाची एकच वारी सुरु होते. आईवडीलांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणखी गडद होत जातात. आपली जीवनशैली आपल्याला एखाद्या आजाराचं गिफ्ट देते.

ही शहरं फक्त आपल्याकडून हिरावूनच घेतात असं नाही. मात्र, प्रत्येकालाच भरभरुन देतात असंही नाही. आपली क्षमता, कुवत यापेक्षा थोडं कमीच वाट्याला येतं. मग गावाकडून कधीतरी चुलत्या, मामा, मावसा यांचा फोन येतो. आई-वडिलांपैकी कुणालातरी दुर्धर आजार झाल्याचे कळते. त्याही वेळी त्यांच्या चिंतेसोबत आता सुट्टी, बॉस, ऑफिस, टार्गेट, प्रॉजेक्ट या गोष्टी ठळकपणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. चार दोन दिवस दवाखाना झाला की नोकरीवर परतायचं. घरच्यांची देखभाल कुण्या नातेवाईकाकडे सोपवून.

कधी तिकडून दुर्दैवी बातमी येते. कधी इकडून रेल्वे ट्रॅकवर, मॅनहोलमध्ये, अपघातात, आजाराने करीअरची शर्यत स्मशानात थांबल्याचं घरच्यांना कळवलं जातं. कधी कुणाला अंत्यसंस्कार मिळतात, कधी अस्थी विसर्जन.
यात चूक या शहरांचीही नाही. पण, काही प्रमाणात आपली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नक्कीच आहे. आजपर्यंत बोटावर मोजण्याइतकेच सोडले तर कुणीही स्थानिक पातळीवर रोजगार, उद्योगधंदे याचा विचार, धाडस करताना दिसत नाही. सगळे लोकप्रतिनिधी स्वतःच्या सात पिढ्यांसाठी जमवण्यात धन्यता मानतात. इतर जण आहे त्यात धन्यता मानतात. सध्या लॉकडाऊन आहे, सगळे विचार करालच.


– अक्षय कुडकेलवार
( 8108867654 )

Related posts

श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात एच. आय. व्ही.-एड्स विषयी जनजागृती व मार्गदर्शन

nirbhid swarajya

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा बळी

nirbhid swarajya

सुटाळा बु.येथील शोरूम मधील जळालेल्या युवकाचा अखेर मृत्यू…

nirbhid swarajya
error: Content is protected !!