January 7, 2025
विविध लेख

कोरोनामुळं जीवघेणी पायपीट…

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपलं गाव सोडून शहराच्या ठिकाणी आलेल्या मजूरांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की आपल्याला पुन्हा असा परतीचा प्रवास करावा लागेल. कोरोनाने या मजुरांसारख्या असंख्य हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे जगणं मुश्कील केलंय. जगायचं की मरायचं? आणि जगायचं तरी कसं? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिले आहेत. हातात पैसा नाही, सोबत अन्न नाही त्यांना फक्त दिसत आहे ते गावातलं आपलं घरं. शहरातल्या ज्या ठिकाणावर ते राहतात तिथून त्यांनी आपल्या घराकडे जाण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय स्वीकारला. 
एसटी, रेल्वे, कार यातून ५ तासांचा प्रवास केला तरी आपल्याला कंटाळा येतो. हे मजूर ज्याठिकाणावरुन आले आहेत त्या राज्यात जाण्यासाठी त्यांना रेल्वेने दोन दिवसांचा प्रवास करावा लागतो. आज कोरोनामुळे त्यांना याच वाटेवरुन पायी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. घरी सुखरुप पोहचेल की नाही हे देखील कदाचित यांना माहिती नाही. गावात पोहचल्यावर गावातली लोकं आपल्याला गावात घेतील की नाही आणि घरचे आपल्याला घरात घेतील की नाही याची देखील शाश्वती नाही. पण नाही इथे भूकेने मरण्यापेक्षा मला माझ्या घरी गेलेले परवडेल असे काहीसे विचार त्यांच्या मनात येत आहेत. 

आपल्या एका मुलाला खांद्यावर एकाला हातात घेऊन ते एक-एक पाऊल पुढे टाकत आहेत. वाट जीवघेणी आहे कारण या ठिकाणी त्यांना ऊन, वारा, पाऊस सगळं काही सहन करायचे आहे. डोक्यावर वैशाखाचं रणरणतं ऊन.. खाली तव्यासारखा तापलेला रस्ता. पायात धड चप्पल नाही. हातात आणि डोक्यावर आणि पाठीवर मोठी मोठी बोजकी. पोटात अन्न नाही. पाण्याचा एक थेंबही नाही. सोबत तान्ही लेकरं. पोरं दमली की खांद्यावर उचलून घेऊन वाट तुडवायची. कारण डोळ्यासमोर दिसतंय ते फक्त घरं. हेच घर गाठण्यासाठीची ही पायपीट. 

या प्रवासा दरम्यान दोन वेळचे जेवण मिळेल की नाही याची देखील शंका. सोबत मुलाबाळांसाठी घेतलेला थोडासा खाऊ आणि रस्त्यात कोणी दिलं तर तेच हे खात आहेत. यामध्ये पोट भरणं देखील मुश्कील. हाताला काम नसल्यामुळे शहरात काहीही छोटं -मोठं काम करेल आणि माझ्या लेकराबाळांचा सांभाळ करेल असं काहीसं स्वप्न उराशी बांधून हे मजूर शहराकडे आले. कोरोनाने त्यांच्या या स्वप्नाचा डाव मांडण्याआधीच उधळला. लॉकडाऊन आज संपेल, उद्या संपेल असं त्यांना वाटत होतं. पण आणखी किती दिवस हे सुरु राहणार याची कल्पना ना सरकारला आहे ना त्यांना. त्यामुळे याठिकाणी राहून आणखी किती दिवस पुढे ढकलायचे. 
ज्या घरात राहतो ते भाडयाचे, घर भाडं द्यायला पैसे नाहीत, खाणारी तोंड अनेक त्यामुळे खायचं तरी काय, चार- आठ दिवस कसे तरी काढले, जे होते तेही पैसे संपले, रेशन कार्ड नाही तर अन्नधान्य कुठून मिळणार, हातावरचे पोट दिवसाला जे कमावले त्यावरच घर चालत होतं ते सुद्धा लॉकडाऊनमुळे बंद झालं, जे थोडं फार जपून ठेवले होते ते पैसे सुद्धा संपले. आता कोणाकडे मदत मागायची. त्यामुळे इथे असं जगण्यापेक्षा आणि भूकबळीने मरण्यापेक्षा कसं तरी आपलं घर गाठलेलं बरं या विचारानं ही पाखरं घराकडे निघाली आहेत. 

हा प्रवास वाटेल तितका सोपा नाही. खूप भयानक आहे. वाटेत जंगल लागतात. लहान मुलं आणि बायकोसोबत आहे. काही महिला गरोदर सुद्धा आहेत. अशा अवस्थेत सुद्धा त्या लांबपल्ल्याचे हे अंतर कापत आहेत. पायाला फोड येतात आणि आपसूकच कधीतरी फुटून जातात पायाला सूज येत आहे, पायाचे गोळे चढत आहे पण हे सांगायचे तरी कोणाला. रस्त्यात कुठे झाड आले तर विश्रांती घेतात. पण अचानक रस्त्यात कुठे कोणी आजारी पडले तर काय? खूप चिंताजनक आहे ही सर्व परिस्थिती. महिलांनी रस्त्यावर शौचाला आणि लघुशंकेला जायचे कुठे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सारं काही गंभीर आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला कुठेही आपल्या बायका-मुलांना घेऊन हे मजूर झोपत आहेत. सोबत असणारे सर्वजण अनोळखी. खूप कठीण प्रवास आहे पण तो पूर्ण करायचा आहे हेच मनात त्यांनी बाळगलं आहे.  
शहरात जाऊन काहीही काम करेल. मुलांना चांगलं शिक्षण देऊन मोठं ऑफिसर बनवेल असं काहीसं स्वप्न होतं. पण या कोरोनामुळे क्षणात त्यांची सारी स्वप्न भंग झाली. आता परत या शहराकडे येणार की नाही हे सुद्धा माहिती नाही. पण आता गावाकडे जाऊन नेमकं करायचं काय? एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ कसा करायाचा  अशाप्रकारचे अनेक प्रश्न एक-एक पाऊल पुढे पडेल तसे या मजुरांच्या डोक्यात येत आहेत. कदाचित याचे उत्तर सापडणार नाही पण आता फक्त जगायचे आहे ते कुटुंबासाठी कारण आपणच एकमेव त्यांचा आधार आहे या भावनेने मनावर दु:खाचा मोठा डोंगर ठेवून ते प्रवास करत आहेत. 

आपणचं आपल्या कुटुंबाचा आधार आहे. आपणच कोलमडलो तर या प्रवासा दरम्यान आपल्या कुटुंबाचं काय होणार या भितीने ते पुढे जात आहे. एक-एक गावं मागे जात आहेत पण रस्ता काही संपत नाहीये. आतापर्यंत पायी वारी, दिंडीबद्दल मी ऐकलं आहे. कधी वारी किंवा दिंडीत पायी गेली नाही. पण वारी आणि दिंडी दरम्यान वारकऱ्यांना प्रत्येक गावात मुक्काम, राहण्याची आणि जेवणाची सोय असते. पण मजुरांच्या या वारीत असे काहीच नाही. कोरोनामुळे ही जीवघेणी वारी त्यांच्या वाट्याला आली आहे. त्यांना काही मैल नाही चालायचे तर अनेक मैलांचा हा प्रवास करायचा आहे. या प्रवासात आपणंच आपलं रक्षण करायचे आहे. तो कधी संपेल यांची सुद्धा माहिती त्यांना नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही वारी जीवन-मरण्याची वारी झाली आहे.

– प्रिया विजय मोरे.
(मुंबई)

Related posts

किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे ! प्रतिमा पायदळी तुडविली;ठाकरे गट आक्रमक

nirbhid swarajya

उदयोन्मुख युवा नेतृत्व गणेशभाऊ ताठे…

nirbhid swarajya

काळ भयानक कठीण आलाय

nirbhid swarajya
error: Content is protected !!