January 7, 2025
बातम्या

जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत आणखी दुकाने उघडण्यास परवानगी

 जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश, कन्टेन्टमेंट झोन बाहेर परवानगी

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र  शासनाने  देशभर १७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच राज्यात व जिल्ह्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाने वस्तु व सेवांचा सुलभ पुरवठा व्हावा म्हणून सर्व दुकाने सकाळी ७ ते सायं ७ या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास सुचीत केले आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यामध्ये संचारबंदी कालावधीत सर्व दुकाने व सेवा सकाळी ७ ते सायं ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये सीलबंद मद्यविक्रीची दुकाने वगळण्यात आली आहे. ती सकाळी १० ते सायं ६ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.


    जिल्ह्यात ह्या सेवा सुरू राहणार : जिवनावश्यक वस्तू विक्री ठिकाणे धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाजीपाला, कृषि संबंधीत सर्व दुकाने, दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, अंडी, मांस, मच्छी, पशुखाद्य व चारा विक्री दुकाने,  रूग्णालये, नर्सिंग होम, क्लिनीक, टेलिमेडीसीन्स सुविधा, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्याचे दुकाने, सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा व संग्रह केंद्रे, पशुवैद्यकीय रूग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथोलॉजी, औषधी विक्री व पुरवठा, रूग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सोयी सुविधांचे बांधकाम, डायग्नोस्टीक रूग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, कच्चा माल व मध्यवर्ती घटकांचे युनीट, शिवभोजन केंद्र, स्वस्त धान्य दुकाने व त्याबाबतची वाहतूक, शेती व फळबागा संबधीत सर्व कामे, कृषि उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा तसेच शेतमालाची उद्योगाद्वारे, शेतकऱ्यांद्वारे शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारी थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरू राहतील. कृषि उत्पन्न बाजार समित्या, शेतीविषयक यंत्र व त्यांचे सुटे भाग विक्री दुकाने, दुरूस्ती करणारे दुकाने, शेतीसाठी भाडेतत्वावर अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके यांचे उत्पादन वितरण व विक्री करणारी कृषि सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतींची बांधकामे सुरू राहतील. दुध संकलन व त्याचे वितरण, पशुपालन व कुक्कुटपालन, गोशाळा सुरू राहतील. बँका, सर्व एटीएम, एलआयसी, पोस्ट ऑफीस संबंधीत सर्व सेवा सुरू राहतील.
  त्याचप्रमाणे लहान मुले, अपंग, विधवा, मतिमंद, ज्येष्ठ नागरिक यांचे संबंधी चालविण्यात येणारी निवारागृहे, लहान मुलांसाठी असलेली निरीक्षण गृहे, सुरक्षा गृहे,  सामाजिक सुरक्षा निवृत्ती वेतन वाटप, अंगणवाडी संबंधीत सर्व कामे, लाभार्थ्यांना पोषण आहाराचे घरपोच वाटप सुरू राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त २० लोकांच्या परवानगीने करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. मात्र नगर पालिका क्षेत्रात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीला या विवाहाची वेळ व दिनांक कळविणे आयोजकांवर बंधनकारक असणार आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी राहील. मनरेगाची कामे करता येतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण व साठवणूकीस परवानगी राहील. पाणी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर सुरू राहतील. दारू सोडून अन्य कोणत्याही वस्तू व सेवांसाठी ऑनलाईन सुविधांचा वापर व घरपोच डिलीवरी देता येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरूस्तीचे दुकाने सुरू राहतील.   
  लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या वैद्यकीय व आपत्कालीन कर्मचारी, पर्यटक व व्यक्तींसाठी हॉटेल, लॉज सुरू राहतील. इलेक्ट्रीशीयन, संगणक अथवा मोबाईल दुरूस्ती, वाहन दुरूस्ती, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरू राहतील. नगर पालिका क्षेत्राचे हद्दीबाहेर व ग्रामीण भागातील उद्योग, बांधकामास परवानगी देण्यात येत आहे. मान्सूनपुर्व संबंधीत सर्व कामे सुरू राहतील. आपत्कालीन सेवांसाठी वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, आवश्यक वस्तू खरेदीसाठी खाजगी वाहने चालकाव्यतिरिक्त दोन प्रवाशांना परवानगी राहील.

जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे : 
सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे मधून सर्व प्रवासी हालचाल बंद राहील, वैद्यकीय कारणा शिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी, अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पुर्णपणे बंदी असेल, सर्व शैक्षणिक प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, बार व तत्सम ठिकाणे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. सायकल रिक्क्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब ॲग्रीग्रेटर, जिल्ह्यातंर्गत व जिल्ह्याबाहेरील बसेस, केशकर्तनालयाची दुकाने, स्पास आणि सलुन्स, तंबाखू व तंबाखूजन्य विक्री दुकाने, पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपहारगृहे व जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिलेल्या आदेशामधील ढाबे वगळून इतर सर्व ढाबे बंद राहतील.
   सर्व बाहेर राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, कामगार व इतर नागरिक आल्यानंतर तालुका समिती यांचेकडे नोंद करून आरोग्याची तपासणी करून घेतील. तसेच त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक राहील. उपरोक्त परवानगी दिलेली सर्व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरू राहणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे


सौजन्य: जिमाका 

Related posts

पत्रकार जितेंद्र कायस्थ यांची अज्ञात व्यक्ती कडून कार जाळण्याचा प्रयत्न…

nirbhid swarajya

बोलेरोच्या खिडकीचा काच फोडून २ लाख ८५ हजार लंपास

nirbhid swarajya

भर उन्हाळ्यात पुर्णा नदित सोडण्यात आले पाणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!