बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची मागणी
बुलडाणा : महाराष्ट्रातील आणि मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनाची लागण झालेल्या मीडिया कर्मचाऱ्यांमध्ये टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, प्रिंट फोटोग्राफर यांचा समावेश आहे. या पत्रकारांची कोरोना चाचणी पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने केली होती. यामधील सर्वाधिक पत्रकार हे इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात यावी, तसेच त्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांच्याकडे दिले आहे.या निवेदनात कोरोना च्या संकट काळामध्ये आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
या सर्व यंत्रणा,अधिकारी, कर्मचारी आपले काम कसे पार पाडत आहेत हे पत्रकार आपल्या माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून कर्मचारी व अधिकाऱ्यांना काम करण्याचे आणखी प्रोत्साहन देण्याचे काम प्रसार माध्यमे करीत आहेत. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया सर्वांचाच सहभाग आहे. ज्या पद्धतीने मुंबई व नागपूर मध्ये पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली, सोबतच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयांचे विमा कवच देण्यात आले, त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांची सुद्धा कोरोना चाचणी करावी व या संकटसमयी शासनाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून पत्रकारांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे असे नमूद केले आहे.
