साधारण 2016 ची घटना असेल मी विधी शाखेच्या द्वितीय वर्षाला असेल,त्या दरम्यानच्या काळात आम्ही ज्या परिसरात वाढलो त्या शंकर नगर मध्ये प्रवज्जा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष बी.के हिवराळे साहेब जे आज पंचक्रोशीत सर्वांचे ‘काका’ म्हणून ओळखले जातात,ते नेहमी विहार हे प्रबोधनाचं केंद्र आहे हा अट्टहास धरून विविध विद्यार्थीपयोगी व समाजाभिमुख कार्यक्रम सतत राबवित असत.आजही ते दोघे पती-पत्नी आपल्यापरीने उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडत आहेत.दर रविवारी एकत्र येऊन शंकर नगरातील तरुणांचं भावविश्व जिंकणं मोठं दिव्यचं परंतु त्यांनी ते लीलया पार पाडले.त्यासाठी त्यांनी वाढदिवस साजरे करणे हे माध्यम ओळखून त्या तरुणाईला एकत्र करण्याचं काम केलं.आणि त्यासर्व संघटित नियोजनानंतर आणि धम्मदानाच्या योगदानानंतर शंकर नगर सारख्या परिसरात एक भव्य-दिव्य अभ्यासिका उभी राहिली.व ती अभ्यासिका संपूर्ण जिल्ह्यात आजही आकर्षणाचं केंद्र आहे.त्याच दरम्यानच्या काळात अशाच एका कार्यक्रमात माझी प्रवीनजी पहुरकर साहेब यांच्यासोबत ओळख झाली.याआधी “आंबेडकरी चळवळ संपली की थांबली” ह्या तुफान गाजणाऱ्या चर्चेतील पुस्तकाचे ते लेखक आहेत याबाबत मला कल्पना होतीच,आणि आपल्या जिल्ह्याला अभिमान वाटावा असे त्यांचे पुत्र राहुल हे टीव्ही जर्नलिस्ट आणि पत्रकारिता क्षेत्रातील मोठं नाव सतत चर्चेत राहायचे.ओळख झाली आणि त्यानंतर सतत आम्ही संपर्कात राहायचो.साहित्याबद्दल आणि आंबेडकरी चळवळीबद्दल त्यांची मते जाणून घेण्यास आम्ही उत्सुक राहायचो.त्याच दरम्यान विहाराच्या अभ्यासिकेत त्यांनी ‘माणूस’ नावाचा कवितासंग्रह लिहिण्यास सुरवात केली होती.दलित-शोषित समाजाचा संघर्ष लेखणीतून समाजासमोर आणावा व त्यातून नवनिर्मितीची बीजे रोवावी हा त्यांचा मानस होता.पिढ्यानपिढ्या दारिद्र्य आणि वर्णवर्चस्वाखाली दबलेला समाज जेव्हा बाबासाहेबांच्या प्रेरणेने आपलं भोगलेलं आयुष्य कागदावर मांडतो तेव्हा ते लिखाण व साहित्य हजारो रक्तात पेटलेले अगणित सूर्य निर्माण करीत असतो. चळवळीची दिशा व दशा या विषयावर आम्ही तासंतास संवाद साधत होतो. प्रश्न विचारत होतो,त्याचं व्यवच्छेदक व समाधानी उत्तर आम्हाला प्रविनजी पहुरकर साहेब नेहमी देत असत.प्रोत्साहन व सहकार्य तर नेहमीच असे.त्याच चर्चे दरम्यान त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ओळख करून दिली.ते या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होते.समितीचे मार्फत होणाऱ्या विवेकवादी शिबिराला ते आम्हाला आग्रहाने उपस्थित राहण्याचा सल्ला देत असत. त्यामध्ये महाराष्ट्रातील नावाजलेले वक्ते आम्ही पहुरकर साहेबांमुळे ऐकले.अकोला येथे शाम मानवांची देखील त्यांनी भेट घडवून आणली.फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला आणि प्रवीण पहुरकर हे समीकरण तर खामगाव शहराच्या किर्तीत भर टाकणारे विशाल कार्य आहे.खामगावमध्ये ज्योतिषशास्त्र एक थोतांड या विषयावर ऐतिहासिक आमना-सामना कार्यक्रम अरजन खिमजी नॅशनल हायस्कुलच्या प्रांगणात पार पडला.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे तत्कालीन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर होते.श्याम मानव आणि ज्योतिषशास्त्रातील विद्वान पंडित चंद्रकांत जकातदार यांचा जाहीर कार्यक्रम झाला. न भूतो न भविष्यती असा तो कार्यक्रम होता.त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांची मुख्य-भूमिका होती.हा कार्यक्रम आयोजन करून वैचारिकतेचे बाळकडू खऱ्या अर्थाने पहुरकर साहेबांनी खामगावला दिले. अशा व्याख्यानमालेच्या आयोजनामुळे त्यांनी जनजागृती व प्रबोधनाचे दिमाखदार कार्य केले आहे.महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत लेखक वक्ते यांच मार्गदर्शन कोल्हटकर सभागृहात मी बसून ऐकले आहे.आणि खामगावकरही मंत्रमुग्ध झाले आहेत.नंतर त्यांनी त्यांची आत्मकथा “पेबुळ” लिहिण्यास सुरवात केली त्याचाही मी साक्षीदार आहे.दया पवार यांचं बलुत,लक्ष्मण मानेंच उपरा, किशोर काळे यांचं कोल्हाट्याचं पोर या आत्मकथनात्मक पुस्तकांनी मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.तेव्हा माझी वैचारिक प्रगल्भता म्हणा किंवा समजून घेण्याची कुवत म्हणा एवढी नव्हती.पण तरीही मला या साहित्याने आतून हेलावून सोडलं होतं..त्याचं परंपरेला वाहिलेले त्यांचं आत्मकथन पेबुळ हे सुद्धा अतीशय वाचनीय आहे.गरिबी-दारिद्र्य-गुलामी-जातीभेद याने भारतीय समाज बरबटलेला आहे.त्या उपेक्षित समाजातुन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आत्मभानामुळे सावलीचाही विटाळ असणारा समाज शिक्षणामुळे ताऱ्याप्रमाणे दिव्य-प्रकाशमान झाला.पेबुळमधून प्रवीण पहुरकर यांचा जीवनसंघर्षाची कहाणी वाचायला मिळते.आणि त्याच संघर्षाची व वेदनेची जाणीव ठेऊन येणारी पिढी नवा आदर्श निर्माण करेल यामध्ये मला तीळमात्र शंका नाही.प्रवीण पहुरकर साहेब यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आम्हां नव्या-पिढीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.त्यांचा आदर व सन्मान नेहमीच हृदयात राहील….त्यांच्या आजतागायत गेलेल्या कार्याला निळा सलाम..! अशा या मोठ्या व महान व्यक्तिमत्वाचा जाहीर सन्मानाचा कार्यक्रम होणे हे गौरवाची बाब आहे.ज्या महानुभावांच्या कुशाग्र बुद्धीत हा सत्कार समारंभ घेण्याची कल्पना आली असेल त्यांना माझे शत शत नमन.गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमासाठी झटणाऱ्या संपूर्ण आयोजक टीमचे खूप खूप आभार..
आपलाच:अॅड.विश्वंभर विजय गवई खामगाव
9503582067