जलंब- जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत.याबाबत – ओरड होत असतानाही सुस्त प्रशासनाचा फायदा घेत जलंब पोलीस आपले चांगभले करून घेत आहेत. याचे जीवंत उदाहरण म्हणजे माटरगावात खुलेआम मटका बाजार सुरु असून मटका खेळणारे व खेळविणारे बिनधास्तपणे आपले अवैध व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.जलंब पो.स्टे अंतर्गत माटरगावं हे एक मोठे खेडेगाव असून या गावाला पंचक्रोशीतील बरीच गावे जुळलेली असून त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे माटरगावं बाजारात दिवसभर ग्रामस्थांची वर्दळ राहते.वरली मटक्याच्या माध्यमातून वाममार्गाने पैसा कमविण्याच्या टोळीने चांगलेच बस्तान बसविले आहे. माटरगाव ग्रां.पं समोरील जागेत वरली मटक्याच्या अनेक पेढ्या व सट्टा लावणाऱ्यांची वर्दळ दिसून येते. ही बाब पोलीसांना माहित नाही असे नाही.परंतु हप्त्यापोटी वरकमाईतून लक्ष्मी दर्शन होत असल्याने जलंब पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.माटरगाव येथील वरली मटक्याच्या अवैध व्यवसायाविरोधात सुज्ञ नागरिक ओरड करीत आहेत. मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अवैध व्यवसायिकांना मोकळे रान झाले आहे.वरली मटक्याशिवाय एक्का बादशहा नावाचा जुगार सह आधी अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील जलंब,पहुरजीरा आदी लहान मोठ्या गावातही अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता नागवली जात असून गरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.मात्र पोलिसांना याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.वरिष्ठ अधिकारी याकडे डोळे झाक करीत असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे आभाळंच फाटलं कुठे कुठे शिवणार अशी अवस्था अवैध धंद्याबाबत जलंब पोलीस स्टेशनची झाली आहे.
