November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी चिखली जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय लोणार विदर्भ व्यापारी शेतकरी सामाजिक

माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ;भाजप कार्यकर्त्याला मारहाण केलीच नसल्याचा दावा!…

काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती…

बुलढाणा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यास मारहाण केलीच नसल्याचा दावा कांग्रेस नेत्यांनी केला आहे. बोन्द्रे यांच्यावरील कथित खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी नेत्यांनी केली आहे. स्थानिय जिल्हा काँग्रेस कार्यालयात आज रविवार दिनांक १९ मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी व दावा केला. ऐन वेळी आयोजित या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा भडिमार होत असल्याचे लक्षात घेता नेत्यांनी पत्रकार परिषद मध्येच आटोपती घेतली. यावेळी सपकाळ म्हणाले की, भाजपा कडून गल्ली ते दिल्ली मनमानी व दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. ईडी,आयकर,सीबीआय विभाग मनमानी करीत आहेत. राहुल बोन्द्रे यांच्या संस्थांत पाच हजारावर कर्मचारी आहेत, त्यांच्या कुटुंबाची शंभर एकर जमीन आहे. इतकी मालमत्ता असणारा माणूस भाजप कार्यकर्त्याच्या खिशातील पाच हजाराची रक्कम व चेन हिसकावून घेईल का? हा प्रश्न आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचे कलम कोणत्याही पूर्व चौकशी शिवाय लावल्याचा आरोप त्यांनी केला. या दडपशाहीची चौकशी करून दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे ही आमची मागणी आहे. राहुल बोन्द्रे यांच्या दिवंगत पित्याविरुद्ध वाकदकर यांनी समाजमाध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह ‘पोस्ट’ बद्धल काहीच कारवाई करण्यात आली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दिलीपकुमार सानंदा यांनी कुणीही कायदा हाती घेऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून बोन्द्रे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.आपण वा जिल्हा काँग्रेस, बोन्द्रे यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन करणार काय? असा प्रश्न विचारला असता, या दोन्ही नेत्यानी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला. वाकदकर यांची पोस्ट आपण पाहिली काय? असे विचारले असता नाही असे सांगितले. बोन्द्रे यांच्या मारहाण प्रकरणी वक्तव्याबद्धल विचारले असता त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रश्नांचा भडिमार होताच, पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली. पत्रकार परिषद महाविकास आघाडीची असली तरी या दोन नेत्यांनीच संबोधित केले. यामुळे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे, राजेश एकडे, ज्येष्ठ नेते श्याम उमाळकर, सुनील सपकाळ, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांना केवळ बघ्याची भूमिका वठवावी लागली. जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे जिल्हा कार्यालय परिसरात होते, मात्र पत्रपरिषदेला ते उपस्थित राहिले नाही, हे विशेष. काय आहे प्रकरण
यापूर्वी १७ मार्च रोजी राहुल बोन्द्रे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपणास मारहाण केल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते श्याम वाकदकर यांनी केला होता. आपण चिखलीतील शिवाजी विद्यालय परीक्षा केंद्रावर मुलाला सोडण्यासाठी आलो असता, पाठलाग करून मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणी त्याच दिवशी रात्री उशिरा बोन्द्रे व इतराविरुद्ध भादवीच्या कलम ३९५, ३९७, ५०४, ५०६ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींनी गळ्यातील तीन तोळ्यांची चेन, चांदीत गठविलेले रुद्राक्ष व खिश्यातील ५ हजार रुपये हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरणी राहुल बोन्द्रे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

Related posts

मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री

nirbhid swarajya

मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मधून तुर लंपास

nirbhid swarajya

World’s Best Teens Compete in Microsoft Office World Championship

admin
error: Content is protected !!