सालईबनात पार पडला पहिला पर्यावरणपूरक विवाह संस्कार
खामगाव : पारंपारिक चालिरिती आणि परंपरांना छेद देत उच्च विद्याविभूषीत जोडप्याने सालईबन ता. जळगाव जामोद येथे श्रमकार्य केले. दोन वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीनंतर दोघे विवाह बंधनात अडकले. वृक्षपूजन आणि संविधानाला साक्षी मानून त्यांनी साथाजन्माचे जोडीदार म्हणून एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला. आपल्याच लग्नात मनोगत व्यक्त करीत कोणताही बडेजाव न करता श्रमकार्य करणाऱ्यांना विषमुक्त भोजनाची मेजवाणी दिली. निमित्त होते ते पाणी फांऊडेशनचे प्रताप गुलाबराव मारोडे (रा. पळशी झाशी ता. संग्रामपूर) आणि पद्मजा प्रदीपराव कवडे (रा. उजनी ता.अंबाजोगाई) यांच्या विवाह सोहळ्याचे. कृषी पदवीधर असलेला प्रताप आणि अभियंता असलेली पद्मजा पाणी फांंउडेशनमध्ये एकत्र आले. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात वॉटरकप स्पर्धेतंर्गत श्रमकार्य केले. सालईबनमध्येही यापूर्वी दोघांनी काही वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. अशातच पर्यावरण रक्षणाचा संकल्प करीत दोघांनी साता जन्माचे साथीदार होण्याच्या आणाभाका घेतल्या. महात्मा फुले पुण्यतिथीचा मुहूर्तसाधून वृक्ष पूजन आणि संविधानाला साक्षी मानून अखेर दोघेही विवाहबध्द झाले. लग्नातील तामजाम आणि खर्च टाळून सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी, पर्यावरण प्रेमी आणि नातेवाईकांना विषमुक्त भोजनाची मेजवाणीही दिली.

तरूणाई फांऊडेशनचे मंजितसिंग यांच्यासह सातपुड्याच्या पर्वतरांगेतील आदिवासी बांधवासोबत महिनाभर श्रमकार्य करून प्रताप आणि पद्मजा यांनी दोन वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. त्यानंतर रविवारी दोघेही साता जन्माच्या बंधनात अडकले. गुरूदेव सेवा मंडळाचे आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी यांनी मंगलाष्टके गाऊन दोघांना आशीर्वाद दिले. आ.संजय कुटे, आ. राजेश एकडे, प्रसेनजीत पाटील, बलदेवराव चोपडे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ, दत्ता पाटील, रामविजय बुरूंगले, जनार्दन हेंड पाटील, नारायण पिठोरे आदी मान्यवरांनी धावपळीतच या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. संचालन अनिल गवई यांनी केले. निसर्गाच्या साक्षीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात श्रमकार्य, वृक्षांना सप्तपदी घालून आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्यावरील एकहजार पानांच्या क्रांती रत्न या महाग्रंथाचे प्रकाशन केले. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्षीमानून प्रताप आणि पद्मजा यांनी एकमेकांचा पतीपत्नी म्हणून स्वीकार केला. बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन मंजितसिंग शीख यांच्या पुढाकारातून गत सहावर्षांपूर्वी आकाराला आलेल्या सालईबनात श्रमकार्य करणाऱ्या वऱ्हाड्यांच्या साक्षीने हा पहिला पर्यावरणपूरक विवाह सोहळा पार पडला.