बुलडाणा : स्थानिक बुलडाण्यातील शासकिय मुलांचे निरिक्षण गृह / बालगृहात दरोडयाच्या गुन्हयात विधी संघर्षग्रस्त असलेले २३ व २५ वर्षीय बालके बालगृहातून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. सदर दोन्ही बालके १३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी फरार झाले असून बालगृहाचे अधिक्षक एम.एम. अष्टेकर यांनी १३ नोव्हेंबर रोजीचं बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेमुळे शासकिय मुलांचे निरिक्षण गृह/ बालगृहात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचा-यांचा हलगर्जीपणा चव्हाटयावर आला आहे.
-किचनच्या मागील दरवाज्याच्या कडी कोंडयाची नटे काढून झाले फरार-
निरिक्षण गृहात १ व बालगृहात १० असे एकुण ११ बालके शासकिय मुलांचे निरिक्षण गृह/ बालगृहात आहेत. त्यापैकी खामगाव येथील दरोडयाच्या गुन्हयात असलेल्या २३ व २५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालक १३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी प्रांगणात खेळत असतांना ते गोंधळ घालत असल्याने काळजीवाहक हे व्हरांडयात बसून लक्ष ठेवत होते. त्या संधीचा फायदा घेवून यातील तिन विधी संघर्षग्रस्त बालकांनी किचनच्या मागील दरवाज्याच्या कडी कोंडयाची नटे काढून भिंतीवरून उडी मारून फरार झाले. सदर घटना लक्षात आल्यावर शासकिय मुलांचे निरिक्षण गृह/ बालगृहात कार्यरत असलेले अधिक्षक, काळजीवाहक व कर्मचाऱ्यांनी परिसरात व बोथा फॉरेस्ट चौक, खामगाव रोड, बसस्टॅँड या ठिकाणी फरार झालेल्यांचा शोध घेतला असता त्यापैकी एक मिळून आला. दरम्यान २३ व २५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त दोन्ही बालके फरार झाली आहेत. या प्रकरणी बालगृहाचे अधिक्षक एम.एम. अष्टेकर यांनी १३ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या बालकांचा शोध घेवून निरिक्षण गृहात परत आणूण देण्याची विनंती केली आहे.