पं.स.नांदुरा उपसभापती सौ.योगिता गावंडे यांचे आवाहन
नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ अंतर्गत लाभ देण्यासाठी शासनाने तयारी केली असून आता ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेवर घरकुलांचा लाभ मिळो अवलंबून आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ मध्ये जिल्ह्यात २,३६,५५९ कुटुंबांची नोंद होती. त्यापैकी ऑनलाईन सिस्टीममधून ३४६२६ कुटुंबाची वगळणी झाली आहे. सद्या जिल्ह्यात प्रपत्र ‘ड’ यादीमध्ये २,०१,९३३ कुटुंबाची नावे समाविष्ट असून सदर नावांमधून अपात्रतेच्या १६ निकषांनुसार ग्रामपंचयात मासिक सभेत ठराव घेवून अपात्र कुटुंबाची यादी तयार करायची आहे. सदर अपात्र कुटुंबाची यादी व ठराव पंचायत समिती कार्यालयास सादर करायचा आहे. त्यानंतर पंचायत समिती बांधकाम विभागातील प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी प्राप्त ग्रामपंचायतीची वगळणी यादी ऑनलाईन करून तसा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविणार आहे. या वगळणी यादीला मंजुरी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मासिक सभेच्या ठरावानुसार सदर अपात्र कुटुंबाची वगळणी झाल्यावर उर्वरीत कुटुंबाची संबंधीत ग्रामपंचायतीची प्रपत्र ‘ड’ ची लाभार्थी यादी पंचायत समितीचा आवास पोर्टलवर प्राप्त होणार आहे. ही यादी एकूण ३ प्रकारची राहील. त्यामध्ये एस.टी., एस.सी. आणि इतर अशा वर्गवारीच्या तीन याद्या प्राप्त होतील. संबंधित ग्रामपंचायतीने ह्या याद्या प्राप्त करून त्यापैकी ‘इतर’च्या यादीमधील अल्पसंख्यांक लाभार्थ्यांची नावे वेगळी काढून अल्पसंख्यांक लाभार्थी यांची चौथी यादी तयार करावी. यानंतर ग्रामस्तरावर ग्रामसभेचे आयोजन करून ह्या चारही याद्यांमधील कुटुंबाचे विधवा, भूमिहिन, आत्महत्याग्रस्त, अतिआवश्यक अशा गरजेनुसार कुटुंबाचा प्राधान्यक्रम ग्रामसभेच्या मान्यतेने ठरवावा. चारही याद्यांमध्ये ठरविलेल्या प्राधान्य क्रमानुसार याद्या तयार करून ग्रामसचिव, पंचायत समिती संपर्क अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्या सहीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठवायची आहे. यानंतर सदर याद्यांना अंतीम मंजुरी प्राप्त होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींची ही प्रक्रीया पुर्ण झाली केवळ त्याच ग्रामपंचायतींना प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ योजने अंतर्गत घरकुलांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याने सर्व ग्रामपंचायतींनी ही कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबाचे जॉबकार्ड मॅपींग करायचे बाकी असेल त्यांचे जॉबकार्ड मॅपींग लवकर करणे गरजेचे आहे. अद्यापही जिल्ह्यात १८,९२० कुटुंबाचे जॉबकार्ड मॅपींग बाकी आहे. कित्येक वर्षापासून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबे प्रपत्र ‘ड’ मधून घरकुलाच्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व पात्र लाभाथ्र्यांना घरकुले मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून आपल्या गावातील लाभाथ्र्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसचिव यांनी आता खऱ्या अर्थाने झटणे जरूरी आहे,असे नांदुरा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.योगीता गावंडे यांनी सांगितले