खामगाव : येथील आदर्श नगर भागात राहणारे लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराजवळ राहणारी ९ वर्षीय लहान मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे सांगितले आहे की,

माझी मुलगी ही अभिषेक अग्रवाल यांच्या घरासमोर तिच्या मित्र- मैत्रिणीसोबत खेळत असताना अभिषेक अग्रवाल याने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला जवळ बोलावले व तिला वाईट उद्देशाने शरीरावर स्पर्श केला. या सर्व प्रकाराला ती लहान बालिका घाबरून जाऊन घरी आली. घाबरलेल्या अवस्थेत ती घरात बसली होती त्यावेळेस तिला पाहून तिच्या आईने तिला विचारणा केली असता तिने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तात्काळ मुलीला घेऊन तिची आई खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाली होती. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपी अभिषेक अग्रवाल याच्याविरुद्ध ३५४, ३५४ अ बाललैंगिक अत्याचार कायदा पोस्को नुसार गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास खामगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे हे करत आहेत. आरोपी अभिषेक अग्रवाल हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लॉयन्स क्लबचा अध्यक्ष आहे. त्याच्याकडून अशा प्रकारचे वाईट कृत्य घडल्याने संस्थेची सुद्धा बदनामी होत आहे. त्यामुळे संस्थेतील वरिष्ठांनी या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून होत आहे.
