खामगाव : एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्याचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण पाहिले आहे. तसेच एखादा आमदार आपल्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करताना आपण भरपूर वेळा पाहिले असेल किंवा ऐकलेही असेल. मात्र एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचा वाढदिवस साजरा करताना आपण कधी पाहिले नसेल किंवा ऐकलेही नसेल. पुणे येथील विश्रमगृहावर वंचितच्या बैठकी दरम्यान एक छोटेखानी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे, तो म्हणजे वंचित चे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांचा आणि तोही खुद्द अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा वाढदिवस केक कापुन साजरा केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, वंचितचे प्रदेशाध्यक्ष तथा पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने हे पक्षाच्या बैठकीसाठी पुणे येथील विश्रामगृहावर आले असता २९ जून रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अशोक सोनोने यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खुद्द अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला त्यामुळे अशोक सोनोने हे भारावून गेले होते. केक कापुन झाल्यावर अशोक सोनोने यांनी बाळासाहेब यांना केक सुद्धा भरविला. यावेळी अशोक सोनोने म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले प्राण आहेत, त्यांचेच नातू श्रद्धेय अँड. बाळासाहेब आंबेडकर समस्त बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत. वाढदिवसा निमित्त केक कापतांना बाळासाहेब स्वतः माझ्या सोबत राहणं हे माझं भाग्य आहे. माझ्या जीवनातील हा ऐतिहासिक परमोच्च आनंदाचा क्षण आहे. माझे आदर्श, माझा नेता या प्रसंगी आज त्यांचा मौलिक वेळ काढून उपस्थित राहिले.

त्यामुळे या क्षणाला सोनेरी झालर निर्माण झाली. कार्यकर्ता म्हणून जीवनाची सार्थकता वाटली. साक्षात बाळासाहेबांसोबत वाढदिवस साजरा करताना जीवनात सर्व काही मिळालं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त श्रद्धेय बाळासाहेब हेच आमचे नेते असणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा बद्दल महाराष्ट्रातील तमाम पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे व स्नेही जनांचे ही आभार त्यांनी यावेळी मानले. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर , प्रदेश उपाध्यक्ष अनिरुद्धताई शिरसाट, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ,अनिल जाधव आदी उपस्थित होते.