January 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ सामाजिक

निशब्द केल भाऊ…..

“गोविंद, अरे गोविंदा “अशी हाक
मी २००९ पासून किती वेळा मारली असेल..माझ्या तोंडात तीळ भिजत नव्हता अगदी.. आज पहाटे त्याच्या मोबाइलवरून फोन आला. मला वाटलं चमत्कारच झाला आणि गोविंदा शुद्धीवरआला…पण नाही, असे चमत्कार होत नाहीत..३ जूनला कळलं आहेच.. “वाघ हो माझा” त्याची पत्नी तिकडून आक्रोश करत होती. मी ही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप मोठा हुंदका आला, माझं मलाच आश्चर्य वाटलं… इतकी खंबीर मी..कशी कोसळले!
पण काही नाते आपल्या आयुष्यात एक जागा भरतात आणि ती पूर्णपणे रिक्तही करतात…जी कधीच भरू शकत नाहीत. मोठ मोठया डोळ्यांचा, चुणचुणीत, पहिलवान टाईप हा गोविंद..२००९-१० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या आयुष्यात आला. माझ्या गाडीवर हल्ला झाला होता, निवडणूक हिंसक वळण घेत होती. ५-६ जण सतीश, गोविंद, अंगद, गंगा, प्रल्हाद, सुरेश हे माझ्याकडे आले. बाकी जण कमी बोलायचे पण गोविंद, म्हणाला, “आम्हाला तुमचं अंगरक्षक व्हायचयं.” तुमचे ‘भाऊ’ म्हणून तुमच्यामागे रहायचं आहे. आम्हाला जिथे जाल तिथे जेवण द्या बस.. बाकी काही नको. मुंडे साहेबांचा वारस तुम्ही आम्हाला जपायचं आहे. खरंच!! जपलं हो या पोरांनी… एक घरी बसला. एक व्यवसायात गेला. पण गोविंद, गंगा, प्रल्हाद, सुरेश आजपर्यंत राहिले. प्रीतमताई राजकारणात आल्यावर नवख्या असल्याने मी त्यांना हे trained लोकं दिले. पण, एके दिवशी गोविंद ला म्हणाले ‘तू माझ्याबरोबर परत ये बाबा गर्दी आवरताना प्रॉब्लेम होतो’… हे सर्व चप्पल, शर्ट, पॅन्ट घालत होती. ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ सुरू होणार होती. त्याआधी कांही दौऱ्यात पोरांचे पाय इतके तुडवले गेले की सुजून गेले. मग, पोलिसांसारखे बूट घेतले. संघर्ष यात्रेच्या गर्दीत एक सारखे दिसावे व ओळखू यावे म्हणून सारखे सफारी शिवले. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचं ‘कडं’ मला सुरक्षित करायचं. त्या कड्यातील एक गडी निखळला. माझ्या केसालाही धक्का न लावण्यासाठी माझ्या या भावांनी इतके कष्ट घेतले की बस्स! मी कुठे कार्यकर्त्याकडे गेले की, बदाम-काजू दिले की मुठीत घ्यायचे आणि यांच्या हातात द्यायचे, कारण त्यांची वरात माझ्याबरोबर उपाशी- तापाशी.. कोणी साखर घातली कोणी पेढा दिला, प्रसाद दिला न मागताच हात वळवला आणि टाकला तो झेललाच यांनी गोड मी जास्त खाऊ नये म्हणून… ” कुंकू उततं ताईला, लावू नका” हे वाक्य एकदा सांगितलं गोविंदला की बरोबर दहा सेकंदात तो पुढे जाणार आणि ते दिवसातून हजार वेळा घोकणार..त्यानंतर माझ्या कपाळावर कुंकू उतले नाही. खिशात पाण्याची बाटली, स्वच्छ नॅपकीन, अशात सॅनिटायझर न चुकता होतचं त्याच्या हातात..स्वच्छता ताईला आवडते म्हणून माझ्या गाडीत मातीचा, धुळीचा कण ही कधी येऊ दिला नाही. बाहेर चिखलात चालताना माझा पाय दगडावरच पडावा असे दगड रांगेत टाकूनच ठेवणार.. चपलेचा व्हिडिओ आणि बातमी सर्वांनी केली पण चप्पल गाळात फसली होती. दोन तीन सुरुवातीच्या काळातील कार्यक्रमात चप्पल सापडली नाही म्हणून मी काढल्यावर बाजूला ठेवायचे. मध्यतंरी मणक्याचा त्रास होता म्हणून अगदी पायापर्यंत घालून द्यायचे.

मी ओरडायचे.. पण, ताई असू द्या हो..तुम्ही साहेब आमचे बाॅस आशिर्वाद मिळतो मग मी ही पाया पडल्या सारखे करायचे आपल्या वारकरी संस्कृतीत करतात तसं..मला तो बाॅस म्हणायचा हे मला नंतर कळायचं. पण तो खरा बाॅस होता. सर्वाची ओळख, सर्व प्रोटोकॉल आणि निर्भीड.. “बघ रे त्याला जरा”. म्हणलं तर एखाद्या गुंडाला ठेचायला तयार..धाडस कमालीचं ! काही स्वार्थ नाही, काही मागितलं नाही. मी तर त्याला गंमतीने ‘दबंगचा सलमान’ म्हणायचे. मुलीला – मुलाला शिकवायचे फक्त आणि Boss चा शब्द पाळायचा..माझा बाण होता तो..सोडला की लागलाच म्हणून समजा..! फटाक्यांचा अंगार माझ्या वर नको म्हणून तुझ्या पाठीवर झेललास तू गोविंदा ! चालत्या गाडीत बसलास आणि पळत्या गाडीतून उडी मारलास बाळा ! एवढे दगडं पडत होते, साहेबांच्या अंत्यविधीत..मी बेशुद्ध सारखी वावरत होते, पण तू मला दगड लागू नये म्हणून दगड झेलत होतास. कितीही गर्दीत मला चेंगरायची भिती नाही वाटली, पण तू तुडवून घेत होतास. किती माया केलीस रे..जन्मदात्या आईसारखी का पोटच्या लेकरासारखी ! माझ्या या संघर्षमय जीवनात मी काहीही नसेन तरी, माझ्या मागे पाठीराखा सारखा तू असशील आणि मला Boss म्हणशील असं गृहीतचं धरलं होतं मी..पण शेवटची भेट झाली तेव्हा मुलीला घेऊन आलास “हसमुख, चुणचुणीत ती ही ! मी म्हणाले हिला IPS करू, मुलाला #IAS ..तर म्हणालास, तेवढं करा ताई बस ! किती निरपेक्ष, समर्पित सेवा केलीस बेटा..मी हे वचन पुर्णच करणार, तुझ्या मुलांना मी खुप मोठं करणार.. तू मला कधीही भिती वाटू दिली नाही. एकटं वाटू दिलं नाही,मी ही तुझ्या कुटुंबाला एकटं वाटू देणार नाही. काही नाती रक्ताची नसतात पण ह्रदयाची असतात. लेकराला सांभाळावं, तसं तुम्ही सर्वांनी सांभाळलं आणि आईला मान द्यावा तसा दिलात आणि म्हणालात Boss तुम्ही माझ्यासाठी अमुल्य आहात. गोविंद..तू पुन्हा होणे नाही. तुझी जागा रिकामीच राहील..१४ वर्ष तू भरून काढलेली जागा..माझे भावं अचूक हेरत होतास तू ..सर्व शब्द झेलत होतास..हा शब्द का ओलांडलास..तू बेटा जगायचं होतंस अजून..! पण त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत रहाशील बाळा..

Related posts

चाकूचा धाक दाखवून पैसे लुटले;आरोपीला अटक

nirbhid swarajya

बुलडाण्यात कोरोना पॉझेटीव्ह मृत रुग्णाच्या परिसरामध्ये शासनाचा रेड अलर्ट

nirbhid swarajya

अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवल्याने दोघांविरुद्ध कारवाई

nirbhid swarajya
error: Content is protected !!