खामगाव : मुलीला पळवून नेल्याच्या रागातून तिघांनी युवकास मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणात मारहाणीच्या गुन्ह्यानंतर आता ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. याबाबत असे की, खामगाव तालुक्यातील नागापूर येथील संजय बुंदे याने गावातीलच रमेश इंगळे यांच्या मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी संजय बुंदे विरुध्द गुन्हा दाखल झाल्याने त्यास ४५ दिवस जेलची हवाखावी लागली. त्यानंतर काही दिवसाने संजयहा गावी आला होता. ३० मार्च रोजी रमेश इंगळे व सतिश इंगळे यांनी संजय बुंदे यास “तु आमच्या मुलीला पळवून नेले व आमची बेईज्जती केली” असे म्हणून लोखंडी पाईने मारहाण केली. यावेळी संजयचे वडील रघुनाथ बुंदे हे आवरण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत संजय बुंदे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सुनिल बुंदे यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुध्द कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजयला अकोला येथे हलविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूर येथे नेत असतांना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात गुन्हयामध्ये वाढ करुन तिघांविरुध्दखुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली.