पर्यावरणस्नेही देशमुख कुटुंबियांकडून पक्ष्यांसाठी पाणी व खाद्य ठेवण्याचे आवाहन
नांदुरा : जागतिक चिमणी दिवस पर्यावरणस्नेही, निसर्गप्रेमी देशमुख कुटुंबियांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. रामराव देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांकडून जागतिक चिमणी दिवसा निमित्त फक्त चिमण्यांसाठी नाही तर त्यांच्या घर-अंगण व परिसरात मुक्त विहार करणार्या विविध पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. झाडांना पाण्याने भरलेली भांडी, खाद्यान्न असलेली भांडी ठेवण्यात आली. जेणेकरून पक्ष्यांना भक्षण व पाणी मिळणे सोयीचे होईल. यासाठी छोट्या पासून तर मोठ्यांनी सुध्दा मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता. वाढते प्रदूषण, जंगलांचा ऱ्हास, दिवसेंदिवस तापमानात वाढ आणि उन्हाळ्यात तर कमालीचे तापमान वाढलेले असते. जिकडेतिकडे ऊन आणि पशुपक्ष्यांसाठी सावली – पाण्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी खूपच त्रास सोसावा लागतो. पाणी न मिळाल्या मुळे कधीकधी नाजूक नाजूक छोट्या अशा पक्षांचे बळीही जातात. हे संवेदनशील मनाला आणि माणुसकीला न शोभणारी गोष्ट आहे. मनुष्य हा निसर्गाचा एक घटक आहे आणि निसर्गातील झाडे हवा पाणी पक्षी माती यांच्याशी त्याचा अतुट असा संबंध आहे. निसर्गचक्र सुरळीत चालू ठेवायचे असेल तर निसर्गाशी जुळवून राहिले पाहिजे. निसर्गाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी सजीवांचे हित आणि निसर्ग संवाद आवश्यक आहे. निसर्ग कुठलीही अपेक्षा न ठेवता मानवाला निस्वार्थपणे भरभरून सर्व काही देत असतो, त्यामुळे त्याची परतफेड करणे शक्य नसले तरी काही प्रमाणात का होईना तसा प्रयत्न केला पाहिजे. जागतिक चिमणी दिवस निमित्ताने पर्यावरणस्नेही देशमुख कुटुंबियांकडून व सामाजिक कार्यकर्ते निलेश रामराव देशमुख यांनी ‘ निसर्ग वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांसाठी पाणी-अन्न याची व्यवस्था करा ‘ असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी रामराव देशमुख, निलेश देशमुख, मंगेश देशमुख, अर्णव देशमुख, अद्वीक देशमुख, इंदुबाई देशमुख, शितल देशमुख, अनिता देशमुख, आरोही देशमुख, समिधा देशमुख, यांसह सर्व देशमुख कुटुंबीय व मित्र परिवार उपस्थित होते.