गरीब विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी अमित जाधव यांची धडपड
शेगांव : करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईनव्दारे शिक्षण देण्यात येत आहे. मात्र , जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील समाजसेवक अमित जाधव यांनी पुढाकार घेत अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी ‘डोनेट डिव्हाईस’ चळवळ सुरु करत घरी पडून असलेले जुने व नादुरुस्त अँड्रॉईड मोबाईल दान करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार जमा झालेले मोबाईल जिल्हयातील आदिवासी पट्ट्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.सध्या करोनामुळे जगभर शिक्षणाचे व्हर्च्युअल क्लासेस सुरे झाले आहेत. वर्गातील शाळा घरांमध्ये भरू लागली आहे. शहरात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण शक्य आहे. मात्र ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात ३ लाखाच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी फक्त ४० टक्के विद्यार्थ्याकडे ऍन्ड्राईड मोबाईल उपलब्ध आहे. जवळपास ६० टक्के विद्यार्थाकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची साधन उपलबध नाहीत. त्यामुळे अमित जाधव यांनी अशाप्रकारचा अभिनव उपक्रम राबवित असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी मदतीचा हात होणार आहे.