खामगाव : एकीकडे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत असतानाच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांची ऑनलाइन चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. खातेधारकांना खात्याचे तपशील न विचारता किंवा ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारा ओटीपीही (वन टाइम पासवर्ड) न विचारता थेट ग्राहकांच्या खात्यातून रक्कम गहाळ होत असल्याच्या अनेक घटना मागील काही आठवड्यांत घडल्या आहेत. येथील बर्डे प्लॉट भागातील मजूरिचे काम करणारे शेख बिसमिल्ला कुरेशी शेख ईसा (३७) हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या भ्रमणध्वनीवर ९ सप्टेंबर २०२० राजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रतापसिंह यांचा फोन आला होता. त्याने सांगितले की, तुमचा २५ लाख रूपयांचा जॅकपॉट लागला आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला आहे. जर तुम्हाला जॅकपॉट घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा, माझ्या अकाऊंटमध्ये १ लाख २०० रूपये भरा. २५ लाखाच्या जॅकपॉटच्या मोहापोटी शे.बिसमिल्ला यांनी प्रतापसिंह याच्या बँक ऑफ बडोदाच्या वेगवेगळ्या ३ अकाऊंटमध्ये १ लाख २०० रूपये भरले. मात्र १३ सप्टेंबर पर्यंत जॅकपॉटचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शे.बिसमिल्ला यांच्या लक्षात आले असता त्यांनी याप्रकरणी काल १४ सप्टेंबर रोजी शहर पोलिस स्टेशनला तक्रार केली. तक्रारीवरून उपरोक्त आरोपीविरूध्द कलम ४२० भादंवि ६६ आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुनिल अंबुलकर करीत आहेत.