ग्रामस्थांनी रचला “बिनविरोध’ चा इतिहास
संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांचा पुढाकार
नांदुरा : तालुक्यातील बेलुरा गट ग्रामपंचायतमधून १९९५ साली स्वतंत्र झालेल्या पिंपळखुटा खुर्द ग्रामस्थांच्या सहकार्यातून सलग सहाव्यांदा अविरोध सात जागेसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत अविरोध ग्रामपंचायत ठरणार आहे.या गावातील जनतेच्या रक्तातच ऐकोप्याची भावना जुडली असून मानसिकता असली तर काहीही होऊ शकते हेच येथील जनतेने ३० वर्षात दाखवून देत गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कंबर कसली आहे. सरपंचपद व सदस्य पदासाठी एकीकडे चढाओढ सुरू असून वेगवेगळ्या बोली या पदासाठी लागत असल्याच्या बातम्या झळकतायेत…! वेगवेगळी प्रलोभने,सहली,हवाई सफर यापर्यंत ही या निवडणुकीने कळस गाठला असून अनेक गावागावांतून मने खराब होण्याचे प्रकारही या निवडणुकीतून वाढले आहे.असे असतांना दुसरीकडे अविरोध परंपरेतून काही ग्रामपंचायती सकारात्मक मानसिकतेतून गावाचे गावपण जपण्यासाठी पुढे येऊन मार्ग काढत आहेत. नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेश पाटील यांच्या वडिलांकडून आतापर्यन्त मिळालेल्या संकल्पनेतून त्यांनी यावर्षीही स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाल्यापासून सलग सहाव्यांदा ही ग्रामपंचायत अविरोध होण्यासाठी पाऊले उचलत एक आदर्श निर्माण केला आहे. १९९५ साली या गावच्या ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाला असतांनाच पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत या गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले.सात सदस्यीय ग्रामपंचायतीमधील सर्वांनी यावेळी एकत्र येऊन ही निवडणूक अविरोध केली. मात्र सरपंचपद रिक्त ठरल्याने उपसरपंच पदी गावातील कडुजी पाटील यांची निवड करून गावची धुरा त्यांनी सांभाळताच विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक विकास साधला व येथूनच गावाला नव्या अविरोध ग्रामपंचायतीचा लढा लागला व तोच पायंडा आजही ३० वर्ष कायम असल्याने तालुक्यात नव्हे जिल्ह्यातीलही कदाचित या ग्रामपंचायतने इतिहास साधला. वीस वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक चळवळीतून पुढे आलेले संभाजी ब्रिगेडचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेश पाटील यांचे गाव असून त्यांचे कुटुंबच गावची यशस्वी धुरा सांभाळत आहेत. ३० वर्षांपूर्वी उपसरपंच पदाची धुरा सांभाळून गावाला गावपण देणारे कडुजी हरसिंग पाटील यांनी दीडशे उंबरठे असलेल्या आपल्या गावातील सर्व जातीधर्मातील लोकांना विश्वासात घेऊन विकास साधला. जसे बोलेल तसेच करून दाखविल्याने गावाची अविरोध निवडणुकीची परंपरा टिकवून ठेवली आहे. तसेच आरक्षण निघाल्यानंतरच सरपंचाची निवड करणार असल्याचेही सदस्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मतदान होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेवर होणारा ही खर्चही टळला आहे.