December 14, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय लोणार विदर्भ सिंदखेड राजा

स्थानिकांच्या सहभागाने होणार लोणारचा विकास -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ला ही लवकरच भेट देऊ

लोणार : लोणार सारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करतांना स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न समाजावून घेऊ, त्यांची सोडवणूक करु व त्यांचा सहभागही ह्या विकास प्रक्रियेत करुन घेऊन हा आराखडा राबविण्यात येईल. याच धर्तीवर ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तेथेही आपण लवकरच भेट देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोणार येथे केली.
उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवराची पाहणी करुन या परिसराचे जतन संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठकही घेतली. यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर,आ.संजय गायकवाड, आ. राजेश एकडे, लोणार नगराध्यक्ष पूनम पाटोळे, मुख्य सल्लागार अजोय मेहता, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, आदी उपस्थित होते. यावेळी लोणार सरोवर संवर्धन विकास कामांबाबत जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी सादरीकरण केले. यात प्राधान्याने करावयाच्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच सुलतानपूर येथील कौशल्य विकास केंद्र व अंजनी खुर्द येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. बैठकीस संबोधन करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोणार परिसर आणि यासारखी अनेक स्थळे ही महाराष्ट्राचे वैभव आहेत. हा लपलेला खजिना आहे. हा आपल्याला जगासमोर आणायचा आहे. लोणार सरोवर परिसराचे जतन संवर्धन करतांना निश्चित प्राधान्य क्रम ठरवून कामे केली जातील. यात जे जे नैसर्गिकरित्या प्राप्त झालं आहे ते जतन करणे ह्याला प्राथमिकता असेल. इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे. सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करणे, प्रक्रिया करणे ह्या सर्व बाबी विकास आराखड्यात आहेत. ह्या विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही. तसेच प्राचिन मंदिरांचेही जतन संवर्धन केले जाईल. याचाच एक भाग म्हणून लोणार महोत्सव आयोजित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. हा विकास करतांना स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर ते समाजावून घेऊन सोडवणूक करु आणि सर्व मिळून ह्या परिसराचा विकास करु,असेही श्री.ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, याच धर्तीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विकास करावयाचा आहे. त्यासाठी नियोजित आराखड्यावर मुंबईत बैठका होतील. या विकासाबाबत प्रश्न समजावून घेऊन त्यावरचे उपाय निश्चित करुन मग प्रत्यक्ष सिंदखेडराजाला भेट देण्यासाठी आपण येऊ, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ठरल्याप्रमाणे आराखडा नक्की झाल्यावर होणारे काम हे वेगात आणि पक्के व्हायला हवे. हे वैभव जपण्याची व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा साऱ्यांची आहे. लोणारच्या विकासासाठी मी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून नियंत्रण ठेवेन, दर महिना, पंधरा दिवसाला प्रगतीचा आढावा घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts

सरकारने तात्काळ प्रायव्हेट हॉस्पिटल ताब्यात घ्या- अशोक सोनोने

nirbhid swarajya

नगर पालिकेच्या व्यापारी संकुलाच्या नावांमध्ये मोठी चूक

nirbhid swarajya

शिक्षकेच्या त्रासाला कंटाळून ३२ वर्षे इसमाची आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!