खामगांव : सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे तसेच डी. जे. व इलेक्ट्रॉनिक पंप धुळ खात असल्यामुळे अचानक आग लागून हजारो रुग्णांना प्राण गमवावे लागू शकतात करिता सदरची अग्निरोधक यंत्रणा १५ दिवसाच्या आत सुरु न केल्यास नाईलाजास्तव वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,शासनाने कोटयावधी रुपये खर्च करुन खामगांव सामान्य रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणेसाठी पाईपलाईन तसेच या पाईपलाईनला पाणी पुरवठा करणारे डी. जे. पंप तसेच इलेक्ट्रॉनिक पंप दिले होते. परंतू सद्यस्थितीत ही अग्निरोधक बंद अवस्थेत आहे.संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली असता असे आढळून आले की, रुग्णालयात लावण्यात आलेले स्मोक डिटेक्टर तसेच अग्निरोधक यंत्रणा हे अपुरे तसेच धुळ खात अवस्थेत पडलेले आहेत. मागील सहा महिन्यापासून डी.जे. पंप, इलेक्ट्रॉनिक पंप हे सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवण्यात आलेले आहेत, पावसाळ्याच्या पाण्यामुळे सदर इलेक्ट्रॉनिक पंप हे खराब झाले असून एकप्रकारे जनतेच्या पैशाची बर्बादी होत आहे तर सदर कामाचे कंत्राटदारासोबत आर्थिक देवाण घेवाण झाल्यामुळे सदरची अग्निरोधक यंत्रणा निकामी तर झाली नाही ना? असे सुध्दा बोलल्या जात आहे.सामान्य रुग्णालय खामगांव येथे अग्निरोधक यंत्रणेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे अचानकपणे आग लागल्यास रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खामगांव शहरात मागील अनेक दिवसांपासून आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू नगर परिषद प्रशासनाची अग्निशमन यंत्रणा सदर आगी विझविण्यात अपयशी ठरल्या आहेत. तसेच सद्यस्थितीत राज्यातील नांदेड, औरंगाबाद व नागपूर येथील रुग्णालयात घडलेल्या घटनांमुळे झालेले मृत्यू पाहता भविष्यात खामगांव येथील सामान्य रुग्णालयात आगीमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी सदरच्या अग्निरोधक यंत्रणेची शासनामार्फत स्पेशल ऑडीट करण्यात यावे व ही यंत्रणा १५ दिवसाच्या आत सुरु न केल्यास नाईलाजास्तव वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देता वेळी जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, मोहम्मद मुमताजीन, वसीम रझा,दीपक महाजन, शेख अलीम, फिरोज खान, सय्यद सैफुद्दीन, मोहम्मद वसीम, सय्यद युसुफ मुंशी, सय्यद इरफान, हर्षवर्धन खंडारे, अमन हेलोडे,वहीत जामा उपस्थित होते.