समस्त घरमालक बंधू,
सप्रेम नमस्कार!
आज मी तुम्हाला हे पत्र लिहितोय, त्याला कारणही तसंच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही घरभाड्याबाबत मी आपल्याला विनंती केली आहे. काहीजणांना वाटंत असेल की मी वारंवार हे का बोलतोय पण गेल्या काही दिवसांपासून मला असंख्य फोन आले. हे लोक भाड्याबाबत अगदी कळवळून बोलत होते, काहींना तर फोनवरच आपले अश्रू आवरणंही कठीण झालं होतं, म्हणून आपल्याशी हा पत्रप्रपंच…
कोरोना हे जागतिक संकट असून त्याचा फटका बसला नाही अशी एकही व्यक्ती सध्या सापडणार नाही. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, ग्रामीण, शहरी अशा सगळ्यांवरच हे संकट आहे. यात सगळेच भरडले असतील तर सर्वांनीच एकमेकांना हात देऊन उभं करण्यासाठी मदत नको का करायला? तसा विचार केला तर गरीब, हातावर पोट असलेला, असंघटीत क्षेत्रातील कामगार, रस्त्यावर छोटा-मोठा व्यवसाय करणारे, शेतकरी, केस करणारे कामगार, घरकाम करणाऱ्या महिला भगिनी, वेटर, रिक्षावाले या तुलनेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला या संकटाची झळ मोठ्या प्रमाणात बसलीय. वास्तविक कोरोनाची झळ सर्वांनाच बसलीय पण या वर्गाकडे हा फटका सहन करण्याची आर्थिक क्षमता नाही. एरवी आज काम केलं नाही तर उद्या घरची चूल पेटेल की नाही याची शाश्वती नसते आणि आज सुमारे तीन महिने झाले हा वर्ग प्रचंड संघर्ष करतोय. बहुतांशी याच वर्गातील लोक, कामगार, विद्यार्थी, छोटे दुकानदार, टपरीचालक हे शहरात सिंगल रुम किंवा दोन रूम भाड्याने घेऊन राहतात. विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, मजुरांची मुलंही यात मोठ्या प्रमाणात आहेत.
हे सगळेच अडचणीत आहेत. भाडं देण्यासारखी त्यांची खरोखरंच आज परिस्थिती नाहीय. कोरोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीने त्यांच्यापुढं भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय, म्हणून त्यांना मदतीची गरज आहे. मग घरमालकांनी अशा काळात माणुसकी दाखवायची नाही तर कधी दाखवायची? अनेक घरमालकांनी माणुसकी दाखवलीही आहे. काहींनी संपूर्ण भाडं माफ केलं, काहींनी निम्मं भाडं माफ केलं तर काहींनी भाडं देण्यासाठी मोठी सवलत दिली. माणुसकी धर्म जपलेल्या या सर्वच भल्या माणसांचे मी मनापासून आभार मानतो. पण अजूनही अनेक घरमालक भाड्यासाठी तगादा लावत आहेत, काहींनी तर विद्यार्थ्यांचं सामानही बाहेर काढल्याच्या बातम्या आल्या. हे पाहून अतिशय दुःख झालं. महाराष्ट्रासारख्या राज्यात असं घडत असेल तर हे योग्य नाही. वास्तविक काही घरमालकांचीही अडचण आहे. एखाद-दुसरी खोली भाड्याने देऊन आलेल्या भाड्यातूनच त्यांचा प्रपंच चालत असतो. अशा मालकांची अडचण आपण समजू शकतो. पण व्यावसायिक अथवा अधिक उत्पन्न असलेले घर मालक यांनी मात्र आपल्या भाडेकरुला आज मदतीचा हात देण्याची गरज आहे. तुम्ही आज त्याला हात दिला तर तो तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. ही माणुसकीची ताकद आहे. राज्य व केंद्र सरकार आपल्यापरीने लोकांच्या हिताची कामं करतंच आहेत, पण जबाबदार, संवेदनशील माणूस म्हणून आपलीही जबाबदारी आहे.
काही प्रश्न हे कायद्याच्या, नियमांच्या पलीकडे जाऊन सोडवायचे असतात. आज कोरोनाचं संकट आलं नसतं तर घरभाडं माफ करा किंवा कमी करा असं तुम्हाला कुणीही म्हणलं नसलं. अडचण आहे म्हणूनच तुम्हाला विनंती करतोय. या विनंतीला मान देऊन सद्सद्विवेकबुद्धीनुसार तुम्ही भाड्याबाबत योग्य निर्णय घ्याल, असा मला विश्वास आहे.
धन्यवाद!
आपला विश्वासू
रोहित पवार
(आमदार)