बुलडाणा : भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाच्या सचिवांनी मासळीच्या मत्स्यखाद्याची गणना अत्यावश्यक वस्तूंमध्ये केली आहे. त्यामुळे त्याची वाहतूक सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. राज्यातही ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात खाद्य / चारा टाकणे, मत्स्यखाद्याची वाहतूक यासह मासेमारीच्या सर्व कृती करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून मत्स्यकास्तकारांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. संबंधित तालुक्यातील ठेकेदार मस्त्यव्यवसाय सहकारी संस्थांनी मासेमारीबाबत नियमितरित्या स्थानिक तहसिलदार तथा पोलीस स्टेशन अधिकारी यांना अवगत करून मान्यता घ्यावी. सामाजिक अंतर राखण्याचे काटेकोरपणे पालन करावे. किमान १.५ मीटरत ते २ मीटरचे अंतर दोन व्यक्तींमध्ये असणे आवश्यक आहे. मासेमारीच्या वेळापत्रकानुसार मच्छिमार अथवा मत्स्यकास्तकार यांची मासे जाळ्याने पकडण्याची संख्या एका वेळेस पाचपेक्षा जास्त नसावी. संबंधित मच्छिमार व्यक्तीने मास्क, रूमाल अथवा टिश्यू पेपर तोंडास घट्ट बांधलेला असावा. हात धुण्यासाठी साबणाचा वारंवार वापर करावा. मासेमारीची कृती करीत असताना कोरोना विषाणू आजारासंबंधीत जर प्राथमिक लक्षणे आढळल्यास तथा संशयास्पद वाटल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
यानुसार शासनाच्या मान्यतेनुसार व जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थेचे सभासदांना / मस्त्यकास्तकारांना मासेमारीच्या सर्व कृती करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. मासळी तसेच मासळीपासून बनविलेल्या पदार्थांमधून कोरेाना विषाणूचा प्रसार होत नाही. सोशल मिडीयावरील खोट्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. तरी मस्त्यव्यवसाय सहकारी संस्थांनी प्रशासनाशी योग्य पद्धतीने संवाद साधून आणि सहकार्याची भूमिका ठेवून मासेमारीच्या कृती करण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, मस्तयव्यवसाय स. इ नायकवडी यांनी केले आहे.
सौजन्य – Dio buldana