जिल्ह्यात ७७ गुन्हे; ५७ आरोपींना अटक
बुलडाणा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच बारसुद्धा बंद आहेत. मात्र जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री, मद्य निर्मिती होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आदींवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदी काळात अशा्रपकारचे ७७ गुन्हे दाखल करण्यात आली असून ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.लॉकडाऊन कालावधी लागू झाल्यापासून २१ एप्रिल २०२० पर्यंत जिल्ह्यात अवैध मद्याबाबत ७७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये हातभट्टी दारू ५०८ लीटर, मोहा सडवा रसायन १०३०९ लीटर, मोहाफुले २० किलो, विदेशी मद्य २७.४५ लीटर, बिअर २०२.८ लीटर, देशी मद्य १०५.२२ लीटर, एक चारचाकी वाहन व १० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली ओहत. अशाप्रकारे एकूण ९ लाख ७१ हजार ५२१ रूपयांचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्ह्यातील भिलवाडा, देऊळघाट शिवार, डोंगरखंडाळा शिवार, सुंदरखेड, डोंगरशेवली, अंबाशी, शिरपूर शिवार, अमडापूर, पेठ शिवार, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर शिवार, खिरोडा व नागापूर शिवार, किन्ही महादेव गाव व शिवार, पारखेड, शेलूडी शिवार, खामगांव, चांदई शिवार, कोलारा, शेळगांव आटोळ शिवार, सावरखेड नजीक शिवार, पळसखेड दौलत शिवार, देऊळगांव घुबे शिवार, गायखेड व हरणखेड शिवार, कुऱ्हा गोतमारा शिवार, शेलापूर, बोराखेडी शिवार, धाड – करडी शिवार, रणथम शिवार, देवधाबा शिवार या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या सुचनेनुसार अधिक्षक बी.व्ही पटारे यांचे कालावधीत करण्यात आलेली आहे. या कारवाईत निरीक्षक जी. आर गावंडे, डि. आर शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी चव्हाण, ए. आर आडळकर, दुय्यम निरीक्षक र.ना गावंडे, एन. के मावळे, वा. रा बरडे आणि यांचे पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, असे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कळविले आहे.
सौजन्य : जिमाका