खामगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. धनंजय देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, खामगांव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिकदृष्टया अत्यंत घायकुतीस आलेला असून पिकांवरील रोगराईमुळे उत्पन्नात देखील घट येण्याची शक्यता आहे.

आधिच कोरोना महामारीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. त्यामुळे कृषी विभागाने या परिस्थितीचे गांभीर्यांने अवलोकन करण्यात येवून शेतकरी बांधवांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अमरावती विभागाचे समन्वयक धनंजय देशमुख यांनी एका निेवेदनाद्वारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. तसेच निवेनदनाच्या प्रति विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलढाणा,उपविभागीय अधिकारी, खामगाव, तहसीलदार खामगाव यांना देण्यात आल्या आहेत.