बुलडाणा : दि 9 जून 2020 रोजी मका हमीभावाने खरेदी करा या मागणीसाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले असता माझ्यावर व भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 20 पदाधिऱ्यांवर प्रशासनाने विविध कलमांव्दारे गुन्हे दाखल करून जुलूम केला आहे . परन्तु या जुलूमला न घाबरता मी शेतकरी व शेतमजूर सर्वसामान्य जनतेसाठी सतत लढत राहून त्यांना न्याय मिळवून देणारा आहे त्यामुळे शासनाकडे मी शेतकऱ्यांसाठी न्याय मागतो तुम्ही गुन्हे दाखल करा अशा प्रतिक्रिया आ सौ श्वेताताई महाले यांनी काल त्यांच्या वर व भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली .आज मका उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मक्याचा हमीभाव सतराशे साठ रुपये एवढा असताना खुल्या बाजारात भाव केवळ हजार रुपये एवढाच आहे . त्यामुळे कष्टाने पिकवलेला मका शेतकरी बांधवांना प्रतिक्विंटल 760 रुपयांचे नुकसान सहन करून विकावा लागत आहे . वास्तविक पाहता शासकीय मका खरेदी 8 मे पासून सुरू होणे अपेक्षित होते परंतु संपूर्ण मे महिना संपला तरी मका खरेदी सुरू झाली नाही . पावसाळा तोंडावर असतांना आज केवळ 28 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झालेले आहे. त्यामुळे 75 टक्के शेतकऱ्यांकडे नवीन लागवडीसाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यातच शासकीय मका खरेदी न झाल्यामुळे शेतकरी बांधव आणखी अडचणीत आला आहे. ही बाब लक्षात घेऊन मी 4 जून रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तत्काळ मका खरेदी केंद्र सुरू करावे असे पत्र दिले व सदर पत्रामध्ये किमान 8 जून पर्यंत हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करावे अशी लेखी सूचना केली व ही सूचना करताना एक महिना प्रशासनाने मका खरेदीबाबत कोणतेही सकारात्मक पावले उचलल्याचे उदाहरण डोळ्यासमोर न दिसल्याने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला . वस्तुतः ठिय्या आंदोलन सुरू असताना चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारीच सुटीवर असल्याचे कळले . त्यांची तब्येत बरी नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी श्री पुरी यांच्यासोबत आम्ही बारदाना कसा मिळेल ? मका खरेदीस तात्काळ कशी सुरुवात करता येईल याबाबत जिल्हाधिकारी यांच्याच दालनात चर्चा करत होतो . सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दिलीप भुजबळ पाटील , जिल्हा कृषी अधीक्षक श्री नाईक , जिल्हा पुरवठा अधिकारी श्री बेल्लाळे , जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री माने आणि सोबतचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्यासोबत सुरू असताना सुटीवर असलेल्या जिल्हाधिकारी महोदया सकारात्मक चर्चा सुरू असलेल्या त्यांच्या केबिन मध्ये येऊन अतिशय उद्धट व उर्मटपणे आंदोलन कसे केले याचा जाब विचारणाऱ्या भाषेत बोलून चर्चेची दिशाच बदलून टाकली . आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची तातडीची गरज असताना त्यावर उपाययोजना न करता माझ्यावर व सोबतच्या निष्पाप सहकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला . हाच दबाव बारदाना उपलब्ध करून देऊन मका खरेदी केली असती तर शेतकऱ्यांची पेरणी सुकर झाली असती. |
विशेष म्हणजे माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री यांनी मिशन बिगीन सुरू केले आहे. आठ जून पासून मिशेन बीगेन अगेन टप्पा सुरू झालेला आहे . सद्य परिस्थितीत संचारबंदी रात्रीच्या काळात लागू आहे.थोडक्यात एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी जमू नये हा आदेश केवळ रात्री लागू होतो . ही बाब लक्षात घेऊन शेतकरी बांधवांच्या हितासाठी आम्ही सामाजिक अंतराचे पालन करून फेस मास्क लावत मका खरेदी तात्काळ सुरू करावी अशा घोषणा दिल्या. असे असताना व नियमांचे उल्लंघन केलेले नसताना दिवसा जमावबंदीचे आदेश नसताना मी व माझ्या सह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर जमावबंदी मोडल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. सामाजिक अंतरांचे पालन करूनही फेस मास्क लावूनही साथरोग प्रतिबंध कायद्याची गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही बाब लोकशाहीला साजेशी नाही. खरेतर शेतकऱ्यांसाठी असे शेकडो गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे. परंतु प्रशासनाचा हा अधिकाराचा दुरुपयोग योग्य नाही. शेतकरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असेल तर आम्ही आवाज उठवायचा नाही का? ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही हा जिजाऊंचा जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे असे शेकडो गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही. शेवटी माझ्यासाठी शेतकरी हित हे सर्वोच्च आहे व राहील.