खामगाव : शिव उद्योग सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. संतोष तायडे यांनी 8 ते 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शहरात सुरक्षा जवान व सुपरवायझर पदाच्या 1 हजार जागेसाठी परमानंट मेगा भरतीचे आयोजन केले आहेे. त्यानुसार बेरोजगार उपस्थित राहून भरतीचा लाभ घेत आहेत. परंतु आयोजकांकडून रोजगाराची खात्री देऊन खिशाला कात्री लावण्याचा प्रकार केल्याचा आरोप होत आहे.भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली आणि एस.आय.एस. इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रा. अनिल अमलकार यांच्या चांदमारी स्थित एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय येथे मेगा भरतीचे आयोजन करण्यात आले आहेे. यासंदर्भात प्रसार माध्यमातून जाहिरात प्रकाशित करून बेरोजगारांना रोजगाराचे व भविष्यातील लाभाचे दिवास्वप्न दाखविण्यात आले. त्यामध्ये वेतन राज्य सरकारगार्ड बोर्ड नियमाप्रमाणे सुरक्षा जवान 14000 ते 18000 रूपये ग्रॉस सुरवातीचे पेमेंट व सुपरवायझरला 18000 ते 22500 रूपये सुरवातीचे पेमेंट याशिवाय पी. एफ. मेडिकल (पुर्ण परिवारासाठी), सेवा लोन सुविधा, ग्रॅज्युइटी, बोनस, ग्रुप इन्शुरंन्स, पी. एफ. पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन, आदी सुविधा व अन्य भत्ते तसेच जवानांच्या दोन मुलांना इंडियन पब्लीक स्कूल देहरादुन मध्ये शिक्षणासाठी मोफत सुविधा उपलब्ध आहेत. असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील काही बेरोजगार युवक भरतीसाठी हजेरी लावत आहेत. काल सुमारे 40-50 जणांची उपस्थिती होती असे समजते. यावेळी त्यांचेकडून रजिस्ट्रेशन व माहीती पत्रकासाठी 100 रूपये व भरतीसाठी पात्र म्हणून 500 रूपये फॉर्मचे घेण्यात आले. भरतीसाठी उपस्थित जवळपास सर्वच उमेदवार पात्र ठरले. तर उमेदवारांना 10 सप्टेंबर रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार असून त्यांना पूणे येथे ट्रेनिंगसाठी पाठविण्यात येईल. यासाठी प्रत्येकाला 13 हजार रूपये मोजावे लागणार असल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. याबाबत काही उमेदवारांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे तक्रार केली असता आयोजक डॉ. संतोष तायडे व समन्वयकांना विचारण्यात करण्यात आली. उमेदवारांना ट्रेनिंगनंतर कोणत्या कंपनीत नोकरी मिळेल यासह सुरक्षा रक्षक म्हणून भरती होत असलेल्या उमेदवारांच्या आर्थिक व नोकरीसंदर्भातील सुरक्षाविषयक प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे मेगा भरतीविषयी साशंकता निर्माण झाली असून नेमके काय गौडबंगाल आहे. हे उद्योगकर्तेच जाणो.