पोलिसांच्या साक्षीने सेना पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की,मारहाण
बुलडाणा:आजपावेतो एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेला शिवसेना आणि शिंदे गटातील वादाने आता जहाल संघर्षांचे रूप धारण केले आहे.आज शनिवारी बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकार्यांना लक्ष्य करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते ,असा थेट आरोप केला. यासंदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलीसानी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. संजय हाडे यांच्या पोटात लाथ घालण्यात आली तर छगन मेहेत्रे यांनाही मारहाण झाली. घटने नंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. हल्ला करून शिंदे गटातील सैनिकानी पोबारा केला.