January 4, 2025
बुलडाणा

शिवभोजन थाळी ठरली स्थलांतरीतांसाठी जगण्याचा ‘आधार’

जिल्ह्यात दररोज १६०० थाळ्यांचे वितरण

बुलडाणा : कोरोना प्रादुभार्व थांबविण्यासाठी शासनाने देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या काळात हाताला काम नसलेल्या व स्थलांतरणामुळे जिल्ह्यात आलेल्या मजुरांना शासन शिवभोजनालयाच्या माध्यमातून नाममात्र 5 रूपये दराने दररोज 11 ते 6 यावेळेत भोजन मिळत आहे. खरे तर ही शिवभोजन थाळी विस्थापितांसाठी जगण्याचा आधारच ठरली आहे.

शासनाची ही शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात बुलडाणा, मोताळा, मलकापूर, सिंदखेड राजा, नांदुरा, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, जळगांव जामोद, शेगांव व खामगांव येथे ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात एकूण 17 शिवभोजनालये कार्यान्वीत असून 1600 थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.

राज्य शासनाची महत्वांकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना बुलडाणा जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.

जिल्ह्यासाठी या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन राबवित आहे. संपूर्ण जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे वितरण सुरू करण्यात येत आहे. सध्या 1600 थाळी वाटप केल्या जात आहे. शिव भोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे. त्यामुळे एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे शक्य झाले आहे.  बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या  शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे. तरी ही शिवभोजन योजना संचारबंदीच्या काळात कमी मिळकत असणारे, स्थलांतरीत मजूरांसाठी जगण्याचा आधार आहे, एवढे मात्र निश्चित!

Related posts

‘त्या’ बालाचा छळ असह्य झाला… २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीव दिला….

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 345 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 89 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

नगर पालिकेच्या व्यापारी संकुलाच्या नावांमध्ये मोठी चूक

nirbhid swarajya
error: Content is protected !!