संबंधितांवर गुन्हे दाखल करा बेलाड ग्रामस्थांची मागणी
मलकापूर ( हनुमान भगत): शासनाच्या विविध निधींच्या वापराचा नियम बेलाड ग्रामपंचायतच्या प्रशासक व सचिव यांच्या संगनमताने धाब्यावर बसून भलामोठा अपहार असल्याचे निदर्शनात आल्याने बेलाड ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मलकापूर यांच्या कडे तक्रार दिली असून, ग्रामपंचायत च्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तांत्रिक अडचणीमुळे बेलाड ग्रामपंचायतीच्या निवडणुका न झाल्याने प्रशासक म्हणून, डोंगरे मॅडम यांची नियुक्ती झाली आहे. स्थानिक बेलाड ग्रामपंचायत चे सचिव गजानन झनके हे असून,या प्रशासक मॅडम व सचिव यांनी संगनमताने ग्रामपंचायत चा व्यवहार अनियमित व बेकायदेशीरपणे चालवला आहे असे निदर्शनात आल्याचे म्हटले आहे. रमाबाई घरकुल योजना अंतर्गत स्थानिक लाभार्थी सिंधुबाई लक्ष्मण निंबोळकर यांना पहिला हप्ता देण्यात आला होता परंतु, त्यांच्या घरकुलाचा कुठलाही ओटा किंवा बांधकाम न करता प्रशासक,सचिव,रोजगार सेवक यांनी संगनमताने चिरीमिरी चा कारभार करून दुसऱ्या हप्त्यासाठी शिफारस करून दुसरा हप्ता मिळवून दिला.
संबंधित प्रकार निधी वापराचा दुरुपयोग असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रशासक यांची नियुक्ती झाल्यापासून कुठलीही आमसभा घेतल्या गेली नाही त्यामुळे ग्रामपंचायत निधीचा कुठलाही हिशोब आम सभेत मांडला गेलेला नाही. ह्या आमसभा सुद्धा कागदोपत्री घेतल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. त्यामुळे ह्या प्रशासक व सचिव यांच्या कार्यकाळात कशा प्रकारे उपयोगात निधी आणला गेला व केलेला जमाखर्च कसा आहे याबाबतची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या संबंधितांच्या काळात केलेले थोडेबहुत कामकाज त्यातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून वापरण्यात येणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा केला आहे. एकंदरीत संबंधित प्रशासक व सचिव यांनी गैरव्यवहार केल्या असल्याने त्यांची सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बेलाड ग्राम मधील हनुमान मुरलीधर भगत, गोपाल प्रकाश सांभारे, रवींद्र चंद्रभान सांभारे, अमृत देवराव संभारे, रवींद्र वामनराव सांभारे, गोपाळ तुकाराम सांभारे यांनी केली आहे.