लोकप्रतिनिधीच्या हस्ते उद्घाटन झालेले पथदिवे पडले बंद
खामगांव : शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू नगरपालिकेने निर्धारच केला असल्याचे पालिकेच्या कारभारावरून दिसते. रस्ते चांगले नाहीत,नाल्या स्वच्छता नाही यासह अनेक समस्यांची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असतेच. त्यात भरीसभर म्हणून आता नांदुरा रोड ते शेगाव रोड पर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात. काही ठिकाणी फक्त हायमास्ट लाईट सुरू असून मोजक्याच ठिकाणी पथदिवे सुरू आहेत. या रोडवरील ९० टक्के पथदिवे रात्रभर बंद असतात. तब्बल हजारो कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रोडवरील पथदिवे सध्या बंद आहेत.

नांदुरा रोडवरील हॉटेल गौरव ते शेगाव रोडवरील मानवधर्म पर्यंत या सर्वच रस्त्यांवरील पथदिवे सध्या बंद आहेत. शहराच्या मुख्य भागात लावण्यात आलेले पथदिवे वगळता अन्य सर्वत्र पथदिवे बंद आहेत.अनावश्यक ठिकाणी दिवेच दिवे अन् अनेक रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असे चित्र सध्या खामगांव शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत दिसते आहे. ‘निर्भिड स्वराज्य’च्या चमूने शहरातील विविध भागातील पथदिव्यांची रात्रीच्या वेळी पाहणी केली असता हे चित्र समोर आले. शहरात अनेक पथदिवे आणि खांब आहेत, पण तेवढा उजेड मात्र दिसत नाही. पथदिवे सुरू असताना सायंकाळी सात वाजता पथदिवे सुरू होऊन रात्री बारा वाजेपर्यंत पथदिवे सुरू असायचे मात्र रात्री बारा वाजे नंतर पथदिवे नगरपालिकेकडून बंद करण्यात यायचे. काही महिन्यांपूर्वीच पथदिवे बंद असल्याने रोडवरील अंधाराचा गैरफायदा घेऊन नांदुरा रोडवर एका हॉस्पिटलमध्ये तसेच नांदुरा रोडवरील काही दुकाने फोडण्याची घटना घडली होती. तसेच पथदिवे बंद असल्यामुळे छोटे-मोठे अपघात सुद्धा रस्त्यावर होत आहेत. हजारो कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रोडवरील पथदिव्यांचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले मात्र नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे काही दिवस पथदिवे सुरू होते मात्र पथदिवे बंद झाल्यापासून याकडे लोकप्रतिनिधींना लक्षसुद्धा देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. सदर पथदिवे बंद झाले तेव्हापासून लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच शहरात चोरीचे प्रमाण जर वाढले तर याला जबाबदार कोण राहिल ? हा सुद्धा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारल्या जात आहे. या गोष्टीचे गांभीर्य समजून स्थानिक लोकप्रतिनिधींनी व नगरपालिकेने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन पथदिवे सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.