खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची हेळसांड
बुलडाणा- शेगाव : कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमधील खाजगी डॉक्टरांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दवाखाने बंद केले आहेत, त्यामुळे इतर आजाराची लागण झालेल्या रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड सुरू आहे. यामध्ये लहान बालकांना सर्दी, ताप असे किरकोळ आजार जडल्याने आणि खाजगी दवाखान्यात उपचार होत नसल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित हे यथोचित प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हाभरातील खाजगी डॉक्टरही मदत करीत आहेत मात्र अशा वेळेतच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे होमटाऊन असलेल्या संतनगरी शेगावातील काही खाजगी डॉक्टरांनी आपली सेवा बंद केल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून शहरातील काही खाजगी डॉक्टर, सोनोग्राफी केंद्र आणि पॅथॉलॉजी लॅब यांनी आपली सेवा बंद केली आहे, या ना त्या कारणाने बंद करण्यात आलेल्या डॉक्टर सेवेमुळे शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका सोनोग्राफी केंद्राच्या संचालकांनी तर आपल्या केंद्रासमोर फलक लावून केंद्र बंद असल्याचे नमूद केले आहे. तर दुसरीकडे एका एमडी पॅथॉलॉजिस्ट ने मागील तीन दिवसांपासून लॅब बंद करून ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेवा बंद करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्या जाईल असा इशारा प्रशासनाने दिल्यानंतरही याचा कुठलाही परिणाम शेगावात झालेला दिसून येत नाही. इतर काळांमध्ये या केंद्रांवर दिवसभर गर्दी असते मात्र ज्या वेळेस राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली अशा वेळेस डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्ट यांनी आपली सेवा बंद केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे अपेक्षित आहे.
याबाबत बुलडाणा शैल्यचिकित्सक यांना विचारणा केली असता ‘सर्व खाजगी आरोग्य यंत्रणेला आग्रहाची विनंती आहे की आपली खाजगी रुग्णालये सुरू ठेवावी. कुठल्याही यंत्रणेला सुट्टी देऊ नये व स्वतः सुट्टी वर जाऊ नये. जेंव्हा जेंव्हा जिल्हा प्रशासन त्यांना सेवेसाठी बोलवेल तेंव्हा त्यांनी सेवेसाठी तत्पर असावे. जे कोणी असे करणार नाही त्यांच्यावर जो कोणी या कायद्याचे पालन करणार नाही त्यावर भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188 प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती मध्ये आपण 24 तास आपले रुग्णालय सुरू ठेवावे व सहकार्य करावे असे बुलडाणा शैल्यचिकित्सक यांनी सांगितले.