खामगांव: व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध ‘युनायटेड फोरम ऑफ महाबँक एम्प्लाईज युनियन्स’ च्या वतीने उध्या सोमवारी (दि.१६) एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या लाक्षणिक संपात राज्यातील महाराष्ट्र बँकेचे बहुतेक कर्मचारी सहभागी होणार असल्याने दैनंदिन कामकाज प्रभावित होणार आहे.महाबँकेच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराने महाराष्ट्र बँकेचे हजारो कर्मचारी त्रस्त झाले आहे. व्यवस्थापन दडपशाही करीत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. सातत्याने होणाऱ्या या मनमानी विरुद्ध राज्यातील कर्मचाऱ्यांनी मागील ५ जानेवारीला काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध नोंदविला.
१२ जानेवारीला क्षेत्रीय व्यवस्थापकांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन संपाचा इशारा दिला. मात्र व्यवस्थापनाने कोणतीच दखल न घेतल्याने अखेर १६ जानेवारीला लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपात राज्यातील बहुतेक कर्मचारी सहभागी होणार असल्याने सोमवारी महाबँकेचे दैनंदिन कामकाज व उलाढाल प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.