खामगाव : वीज बिल वसुली साठी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकी असलेली वसुली करण्याचे सक्तिने सांगितले आहे. त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून वीज बिल वसुली धडक मोहीम राबवण्यात येत आहे. याच वीज बिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकाला जमावाकडून मारहाण करण्यात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न येथील धोबी खदान भागात घडली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने विद्युत विभागाचे शेकडो कर्मचारी शहर पोलिस स्टेशनमध्ये धडकले होते. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान आपल्या पथकासह शहरातील धोबी खदान परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेले. काही जणांनी वीज बिल भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यावेळी संबंधितांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहिम राबविण्यात येत असतानाच, धोबी खदान परिसरातील संतप्त जमावाने महावितरणच्या पथकावर हल्ला चढविला. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारहाण केली. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे समजताच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी शहर पोलिस स्टेशनमध्ये धडकले. याप्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी धोबी खदान भागातील जमावापैकी भादंवी कलम १४३, १४७, १४९, ३५३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर वीज विल वसुलीसाठी आलेल्या पथकाकडून लोटपाट आणि अशोभनीय कृत्य केल्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेनंतर धोबी खदान येथील संतप्त जमाव शहर पोलीस स्टेशनमध्ये धडकला. तत्पूर्वी महावितरण पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ महावितरणचे अधिकारी, कर्मचारी शहर पोलीस स्टेशमध्ये धडकले. तक्रारीच्या अनुषंगाने पथकातील कर्मचारी आणि जमावामध्ये पोलीसांसमोरच खटकेही उडाले.