खामगांव : तालुक्यातील आवार येते वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आवार येथे रामदास मांजरे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली, तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मजूराच्या अंगावर सुद्धा वीज पडली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी तात्काळ दोघांनाही खामगांव येथील एका खाजगी हॉस्पिटल मधे भर्ती केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी रामदास मांजरे यांना मृत घोषित केले. तर मजूराची प्रकृति गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

सदरची घटना आज दुपारच्या दरम्यान घडली आहे. यातील मृतक रामदास मांजरे हे आवार येथील गुंजकर एज्युकेशनल हब येथे लायब्ररी असिस्टंट म्हणून कार्यरत होते. मात्र लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने ते शेतात काम करण्याकरता गेले असता त्यांच्यावर काळाने अशाप्रकारे झडप घातली आहे. त्यांच्या जाण्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.