मेहकर: गुरूपूजन ही भारतीय तत्वज्ञानाने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. जीवनाची सफलता, यशस्वीता व कृतार्थ जीवनासाठी दृश्य-अदृश्यतील गुरूचा सहवास, शिकवण आवश्यक असते. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे असंख्य भाविकांच्या गुरूस्थानी आहेत. व्याधीग्रस्त, दीनदलित, पीडीत, अनाथ,अपंग अशा लक्षावधी जीवांच्या जगण्यात महाराजांमुळे परिवर्तन घडून आले व आज त्यांचे जीवन प्रकाशित झाले आहे. महाराजांनी स्विकारलेला शिवभावे जीवसेवा हा प्रॅक्ट्रीकल धर्मविचार आणि अंगिकारलेला विज्ञानवाद हजारो तरूणांच्या नवविचारांना प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे तरूणांना त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान आकर्षीत करते. विवेकानंद आश्रमाने ‘भाविकांनी आपल्या घरीच राहूनच प्रतिमा पूजन करा. स्वतःची व इतरांची सुरक्षितता बाळगा. शासनाने व आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. तीच खरी गुरूदक्षिणा ठरणार आहे.’ असे आवाहन केले होते.
अत्यंत मर्यादीत स्वरूपात आज गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजन विवेकानंद आश्रमात संपन्न झाले. दादासाहेब मानघाले यांनी समाधी पूजन केले. सकाळी ८ वाजता हरिहरतीर्थावर झालेल्या पूजेनंतर विवेकानंद नगर गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. गावकऱ्यांना घरपोच मास्क व सॅनिटायझरचे मोफत वितरण तसेच आरोग्यवर्धक टॅबलेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आश्रमाचे कोवीड योध्दे प्रत्येक घरापर्यंत जावून आरोग्याचा संदेश देत होते. प.पू.शुकदास महाराजश्रींनी स्थापित केलेला विवेकानंद आश्रम भाविकांसाठी तीर्थक्षेत्र बनला असून ज्ञान-विज्ञान, शिक्षणाने व आरोग्य सेवेच्या माध्यमातून हा आश्रम जनकल्याणाचे मोठे केंद्र बनला आहे. कोवीड महामारीमुळे गुरूचे दर्शन व पूजन घरूनच करण्याची वेळ आल्यामुळे हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे. सोशल डिस्टंसींग हा माणसाला माणसापासून दूर करणारा व केवळ स्वतःपूरतेच जगण्याचा विचार करायला लावणारा कोरोना जगातून हदपार व्हावा अशी प्रार्थनाच आज समस्त भारतीयांनी आपल्या गुरूचरणी केली असावी. असे मत विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष भगद्गीतेचे चिंतनकार आर.बी.मालपाणी यांनी ऑनलाईन भाविकांशी संवाद साधतांना व्यक्त केले. विवेकानंद आश्रमाने २०० बेडची व्यवस्था केली असून कोरोना संकटकाळात अनेक परप्रांतीयांना भोजन, रोगाविषयी जनजागृती, सर्वसामान्यांना घरपोच मदत व शासनास सर्वतोपरी सहकार्य केले असून जनसेवा हेच खरे गुरूपूजन असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
previous post