शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वॅब घेऊन विकले
कंत्राटी कक्ष सेवक विजय राखोंडे ला अटक
आणखी आरोपी वाढण्याची शक्यता….
खामगांव : खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाची टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यात १५ दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार राज्यातील अनेक शहरांमध्ये उघडकीस आले आहे. असाच एक प्रकार खामगाव शहरात उघडकीस आला आहे. या ठिकाणी तलाव रोड वरील पारले कंपनी च्या काही कर्मचाऱ्यांना निगेटिव्ह असतांना पॉझेटिव्ह दाखवून त्यांना लाखोंचा विमा आणि इतर सुविधा मिळवून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश खुद्द रुग्णालय प्रशासनानेच केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून रुग्णालयातील एका कंत्राटी कक्ष सेवकाला अटक करण्यात आली आहे. खामगाव शहरात तलाव रोड वरील पारले कंपनीमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत असून या कंपनीमधील कर्मचारी जास्त प्रमाणात कोरोना पॉझेटिव्ह येत असल्याची माहिती खामगाव येथील उपजिल्हा प्रशासनाला समजल्यावरून त्यांना याबाबत शंका आली त्यांनी याबाबत पळत ठेवली असता पॉझेटिव्ह रुग्ण ज्या वॉर्डात भरती आहेत . त्या वॉर्डात बुधवारी सायंकाळी तपासणी केली असता वार्ड मधे ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांना काही रुग्णांनी नाकात दुखत असलयाचे सांगितले.
याबाबत विचारपूस केली असता एक इसमाने काही रुग्णांचे स्वॅब नमुने पुन्हा नेल्याचे समजले. सुरक्षा रक्षकाडून विचारपूस केली असता विजय राखोंडे नामक कर्मचारी येऊन गेला असल्याचे समजल्यावरून राखोंडे याला रुग्णासमोर हजर केले असता रुग्णानी त्याला ओळखले. दरम्यान त्याने कबुली देत पारले कंपनीमधील चंद्रकांत उमाप रा. खामगाव हा आपल्याला प्रत्येक स्वॅब मागे ५ हजार देणार होता अशी कबुली दिल्यावरून निवासी वाद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश टापरे यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसंनी या प्रकरणी कंत्राटी कक्ष सेवकाला अटक केली असून चंद्रकांत उमाप हा आरोपी फरार आहे. विमा मिळविण्यासाठी सुरु असलेला हा खेळ किती दिवसांपासून सुरु होता, आणि यात कोणकोण सामील आहे हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. असेच यासोबतच अजून कोणते मोठे रॅकेट या रुग्णालयात सुरू आहेत का ? त्यामध्ये रुग्णालयातील काही कंत्राटी कर्मचारी व अजून कोणी सहभागी आहे का ? हे सुद्धा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णांना सुद्धा त्रास आहे, अशी चर्चा आता खामगाव शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.