खामगाव : प्रत्येक क्षेत्रात विकास कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना कमिशन द्यावे लागते हे सर्वत्र सुरू असून असा पायंडाच पडलेला आहे.हा भ्रष्टाचार असला, तरी जणू काही शिष्टाचार झाला आहे. त्यातच जलंब सरपंच पती उत्तमराव घोपे यांनी विकास कामे करताना मिळालेले कमिशन विकास कामावर खर्च केले आहे,असं वक्तव्य केल्याने खळबळ माजली आहे.त्यामुळे इतर सरपंच मंडळींमध्ये नाराजीचा सूर उमटला असून आपली बदनामी होत असल्याचा भाव निर्माण झाला आहे. जलंब सरपंच सौ मंगलाताई घोपे यांनी अडीच वर्षात सुमारे अडीच कोटीची कामे केली याबाबतचा लेखाजोखा मांडण्यासाठी शनिवार दिनांक २१मे २०२४ रोजी जलंब येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बोलताना सरपंच पती उत्तमराव घोपे यांनी अडीच वर्षात अडीच कोटीची विकास कामे केली असून या पोटी जे काही कमिशन मिळाले ते (बावीस लाख) सर्व विकास कामावर खर्च केल्याचे वक्तव्य करून कमिशनचा लेखाजोखा मांडला.त्यांच्या या वक्तव्यावरून मात्र इतर सरपंच मंडळी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.जलंब सरपंच पतीने कमिशन घेतल्याचे कबूल केले,.व हे कमिशन इतर विकास कामावर खर्च करून स्वार्थातून परमार्थ साधला.पण ज्या विकास कामाचे कमिशन मिळाले त्या कामाचा दर्जा काय असणार? असाही प्रश्न निर्माण होत आहे.एकंदरीत सरपंच पतीचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे.“ताईच्या गावाला जाऊ या,कमिशन कसे मिळाले ते पाहूया”.सरपंच पतीने विकास कामात कमिशन मिळत असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत.सरपंच मंडळी तर हैराण झाली आहेत.सोशल मीडियावर परस्परांशी संवाद साधून ”ताईच्या गावाला जाऊया कमिशन कसे मिळाले पाहूया” असे म्हणून जलंब ग्रामपंचायतला भेट देण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
previous post