सिंदखेड राजा : तालुक्यातील देऊळगाव मही नारायण खेड दिग्रस साठेगाव, हिवरखेड पूर्णा, सावरगाव तेली इत्यादी ठिकाणी नदीपात्रातून दिवस-रात्र बेसुमार अवैध वाळूचा उपसा करण्यात येत आहे चोरट्या वाळू वाहतूक कडे महसूल विभागातील अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून दररोज हजारो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू असून याविरोधात माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. खडक पूर्णा नदीत पाणी साचले तर परिसरातील पिण्याच्या आणि सिंचनासाठी पाण्याचे उपयोग होतो.
मात्र नदीपात्रातील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने पडलेले पावसाचे पाणी सुद्धा नदीपात्रात वाचले नाही, असे असतानासुद्धा नदीतून जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करून वाळूची चोरी करण्यात येत आहे. दररोज हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात असल्याने पात्राची चाळणी झाली आहे. यामुळे रेती उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून महसूल वसूल करावा आणि रेती उपसा करण्यास वाव देणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.