चिखली : नागपूर हायकोर्ट येथील विधिज्ञ अँड प्रदीप पाटील क्षीरसागर यांच्याकडून वाढदिवसानिमित्त ‘जिजाऊ सृष्टी’ला विकास कामांकरिता एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये विधिज्ञ म्हणून सेवारत असलेले अँड प्रदीप पाटील क्षीरसागर मूळ नीमखेड ता मलकापुर येथील रहिवासी आहेत. गेली पंधरा वर्षापासून ते नागपूर येथे हायकोर्टात विधिज्ञ म्हणून सेवारत आहेत. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजवर विविध विधायक उपक्रम राबविले आहेत. ११ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी यावर्षी जिजाऊ सृष्टीला देणगी देण्याचा मानस व्यक्त केला होता.
चिखली येथे अँड प्रदीप पाटील क्षीरसागर यांनी पुरुषोत्तमजी खेडेकर, सौ रेखाताई खेडेकर यांच्या उपस्थितित जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे यांना एक लाख रकमेचा धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी त्यांच्या सुविद्य पत्नी अँड मिराताई क्षीरसागर , बंधु प्रवीण क्षीरसागर तसेच मराठा सेवा संघाचे प्रकाश टिकार, मोहन अरबट ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटिल, एस पी संबारे, पुरुषोत्तम वनारे ,रविंद्र भोलवनकर उपस्तित होते. या प्रसंगी रेखाताई खेडेकर यांनी जीवनरेखा हा ग्रंथ भेट त्यांना दिला. मातृतीर्थ म्हणून जगात ख्याती असलेल्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यात जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कामानिमित्त बाहेरगावी रहावे लागत असले तरी या मातीशी माझं नातं कायम आहे आणि या मातीचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न मी जिजाऊ सृष्टीला छोटीशी मदत करून करत आहे असे अँड प्रदीप पाटील क्षीरसागर यांनी सांगितले आहे.