खामगांव : तालुक्यातील नागझरी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने वरली मटक्याच्या जुगारावर छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार झाला असून अडीच लाखचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागझरी शिवारात वरली-मटक्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागझरी येथे ५:३० च्या सुमारास छापा मारला असता संदीप शंकर वाळके, ज्ञानेश्वर नामदेव पवार, जितेश रघुनाथ डोंगरे, दीपक नामदेव शर्मा, कर्तारसिंग लीकडे तसेच उंद्री येथील अरविंद मधुकर आराख हे वरली मटका खेळताना मिळून आले पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून यातील अरविंद मधुकर आराख हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

तर इतर पाच जुगारी यांची पोलिसांनी झडती घेतली असता साहित्यासह २ लाख ५६ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या पथकातील पोहेका सय्यद हारुण इसा यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त ५ आरोपी विरुद्ध कलम १२ तसेच सह कलम १८८, २६९, २७०,१०९ भादवी ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ सह कलम ३ साथरोग अधिनियम १८९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.