खामगांव : खामगांव येथील सहाय्यक फौजदार श्याम पाटील यांचा मुलगा अनिरुद्ध आणि मुलगी डॉ. दिपाली पाटील हे तिघेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य पार पाडत आहेत. वाडी येथील रहिवासी सहाय्यक फौजदार श्याम पाटील हे शेगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन रस्त्यावर येऊन आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलीस दलात श्याम पाटील हे सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मीच माझा रक्षक ही मोहीम हाती घेतलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाशी लढण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देत आहेत व सर्वच पोलीस बांधव बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विरोधात लढा देत आहेत.
यामध्ये फौजदार श्याम पाटील हे सुद्धा आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत व शेगांव येथे गजानन महाराज मंदिर परिसरात आपली ड्युटी करत आहेत. तसेच त्यांची मुलगी डॉ. दिपाली पाटील ही एमडी मेडिसिन असून मुंबई येथे नायर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या टीममध्ये सहभागी आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी डॉक्टर मेहनत करत आहेत. त्यातच खामगांव येथील सहाय्यक फौजदार यांची कन्या डॉ. दिपाली पाटील ही सुद्धा आपले योगदान देत आहेत, तसेच सहाय्यक फौजदार शाम पाटील यांचा मुलगा अनिरुद्ध पाटील हा सुद्धा खामगांव नगर पालिकेने स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकात वाहन सेवा देत आहेत. एकाच कुटुंबातील तिघेही कोरोना च्या संकट काळात सेवा देत आहेत, या तिघांच्या कार्याला निर्भिड स्वराज्य चा सलाम..!