सिंदखेडराजा : सध्या कोविड 19 या साथीच्या रोग प्रसारामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जादा दराने तसेच प्रमाणापेक्षा कमी अन्न धान्य वितरण केल्याचा प्रकार ८ एप्रिल रोजी उघड झाला होता. त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची दखल घेतली. दुकानदार भास्कर साळवे यांच्यावर यंत्रणेमार्फत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही रद्द करण्यात आलाय. सोनोशी येथील शिवानंद गजानन आघाव ह्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याने स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे यांचेकडून गहू आणि तांदूळ घेतले. त्यावेळी साळवे यांनी धान्य कमी दिल्याचे तसेच रक्कमही जादा घेतल्याचा प्रकार घडला आहे. ह्या प्रकरणाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावरुन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी घेत प्रकरणाची चौकशी आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पुरवठा विभागाकडून चौकशी कल्यावर त्यात सोनोशी येथील स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करीत, गावातीलच अन्य दुकानदाराकडे शिधापत्रिका धारकांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.