मुंबई : राज्यात लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरी देखील, कोरोनाग्रस्तांची संख्याही वरचेवर वाढत आहे. महाराष्ट्रासाठी कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजीचे कारण ठरताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भारत बायोटेक ची कोरोना लस घेतली. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी वक्तव्य करताना, “कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल,” असं म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ येते हे तसे स्पष्ट असले, तरीदेखील राज्यात प्रत्येक जिल्ह्यातच सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यासाठी येणारे दोन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. “जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की, लसीकरण करुन घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे”, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
next post