सोशल डिस्टन्सिंग चा उडतोय फज्जा
खामगांव : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत होता. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल घरीच पडलेला होता.
लॉकडाऊनमुळे शेतमालाला भाव मिळणार नाही. शेतमालाची वाहतूक, मार्केट पर्यंत कशी करायची छोट्याशा घरात शेतमाल कशा आणि किती दिवस राखून ठेवायचा शेतीचा हंगाम आणि पेरणीचा काळ समोर येऊन ठेपला होता.
राज्य सरकारने शेतकऱ्यांची ही दुरावस्था व संकट लक्षात घेवून १ एप्रिल पासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या काही अटींच्या अधीन राहून सुरू केल्या आहेत. खामगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आता शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने तुर, गहू आणि हरभरा या मालाची आवक सर्वात जास्त आहे.
खामगांव च्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बुलडाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमधून देखील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात व यामध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊन च्या काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल विक्रीसाठी आणल्याने खामगांव बाजार समितीत वर्दळ वाढली आहे.
लॉकडाऊन मध्ये शासनाच्या आदेशानुसार, बाजार समितीत गर्दी होऊ नये, यासाठी टोकन पद्धतीचा वापर देखील करण्यात येत आहे. दिलेल्या तारीख व वेळेत शेतकरी आपला माल आणत आहेत. तरीही यावेळेत देखील हमाल, व्यापारी व शेतकरी यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नाहीये. सोशल डिस्टन्सिंग चे पालन न करता लिलाव व खरेदी केली जात असल्याने सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडाल्याचे चित्र बाजार समितीमध्ये दिसून येत आहे.