बुलडाणा : कोरोना व्हायरसनं आता भारताला विळखा घालायला सुरुवात केली आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे आता घरी राहून नेमकं काय कराव असा प्रश्न सर्व लोकांच्या मनात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीलाही या Covid – 19 व्हायरसचा फटका बसताना दिसत आहे. सिनेमांचे शूटिंग थांबवण्यात आले आहेत. नवे सिनेमा प्रदर्शित होत नाही आणि डेलिसोपचे शूटिंग सुद्धा बंद पडल्यानं टीव्हीवर काय कार्यक्रम पाहावे हा प्रश्न सध्या निर्माण होताना दिसत असल्याने आता केंद्र सरकारनं एकेकाळचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो रामायण शनिवार पासून पुन्हा प्रसारित करने सुरु केले आहे.
दूरदर्शनच्या डीडी नॅशनल वाहिनीवर सकाळी नऊ ते दहा आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत रोज दोन भाग प्रसारित करण्यात येत आहे. ८० च्या दशकामध्ये आतासारखे केबल, डिश टीव्ही आणि केबलचे हे प्रकार नव्हते. त्याकाळी केवळ दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच वाहिन्या होत्या. त्यामुळे त्याकाळी प्रेक्षकांचं मनोरंजनाचं साधन म्हणजे या दोन वाहिन्याच. या वाहिन्यांनी त्यावेळी ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ सारख्या पौराणिक कथा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. या मालिकांपैकी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका बरीच गाजली होती.
सध्या देशात कोरोनाच्या जागतिक साथीच्या मुकाबल्यासाठी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउन मुळे घराघरांमध्ये सक्तीने बंद होऊन राहावे लागणाऱ्या नागरिकांसाठी दूरदर्शनने शनिवार पासून रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण सुरु केले. यामुळे आता बच्चे कंपनी पासून पासून घरातील प्रत्येक सदस्य मालिकेच्या वेळेवर घरात एका जागी जमत आहेत व घराघरात रामयणाचा गजर होतांना दिसून येत आहे.